पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४१)

लोक वर आले व कर्तृत्व दाखवू लागले म्हणजे त्यांचाही नाश होतो, असे त्याला सांगावयाचे आहे. जात्यंतर, वर्णांतर, वृत्तिसंकर यांचा येथे काही एक संबंध नाही. तर उच्च पदाला जो जातो तो- मग तो कोणच्याही थरातला असो- नाश पावतो, त्याच्या फार पिढ्या टिकत नाहीत असे हे मत आहे. त्यांतही महत्त्वाकांक्षेमुळे व मोठेपणामुळे वंशनाश असा कार्यकारण संबंध नाही तर महत्त्वाकांक्षेमुळे उशीरा विवाह, उशीरा विवाहामुळे कमी संतती च कमी संततीमुळे पुढे वंशनाश असा हा परिस्थितीमुळे, व आर्थिक अडचणीमुळे निर्माण झालेला संबंध आहे (पान १५५). येथे आनुवंशाचा संबंध नाही. वर्णांतराचा नाही. तसा असता तर खालच्यांना वर चढू देऊ नये असे त्याने सांगितले असते. पण तो तर उलट खालच्यांना वर चढविण्याची ही सोपानपरंपरा (Social ladder) समाजाच्या प्रगतीला फार आवश्यक आहे असे सांगतो. संस्कृती कशी नाश पावते हे सांगतांना कोणच्या क्रमाने नाश होतो, एवढेच फक्त त्याने सांगितले, त्यात वरील वाक्य आले. व प्रथम वरच्या थरांतले व मग खालच्याही थरांतले कर्तृत्व एकच कारणामुळे नाश पावते असे त्यांचे विधान आहे. आणि त्या नाशाचे कारण आर्थिक आहे, जीवनशास्त्रीय नाही.
 हॅवेलॉक एलिसचे हेच म्हणणे आहे. त्याची कारणमीमांसा मात्र जरा निराळी आहे. तो म्हणतो समाजांत जी जबाबदारीची फार मोठी कामे आहेत, ती कोणीही, कोणच्याही वर्गातल्या माणसाने केली तरी त्याच्या घराण्याचा लवकरच केवळ जास्त दगदगगीमुळे नाश होतो. 'As a family attains highest culture and refinement which civilization can yield that family tends to die out at all events in the male line.' येथे घराणे असे त्याने म्हटले आहे. अमुक जातीतील घराणे असे नाही. व ते नाश पावते ते दगदगीमुळे अती ताण पडल्यामुळे. (Increased work for nervous system) वर्णांतरामुळे नव्हे, जो कोणी हे दगदगीचे काम करील तो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र कोणीही असो, तो नाश पावेल, म्हणजे त्यांचे घराणे लवकर निपुत्रिक होईल असे तो म्हणतो; पण म्हणून वरच्या वर्गाचे काम खालच्या वर्गातील घराण्यांनी करू नये, असे तो कोठेचे सांगत नाही. उलट शेक्सपीयरगटे यांच्यासारखे होऊन तीन पिढ्यांत नष्ट झालेले पुरवले,