पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३९)

दिसेल एका जातीने दुसऱ्या जातीचा धंदा करणे याचे नांव वृत्तिसंकर. रक्तसंकराइतकी याची कोणी निंदा करीत नसले तरी वृत्तिसंकर अगदी निषिद्ध मानला आहे ह्यांत शंका नाही.
 ब्राह्मणांनी वैद्यविद्या, शिल्प, व्याजबट्टा, पशुविक्रय व राजसेवा ही करू नये असे मनूने एके ठिकाणी सांगितले आहे. (३-६४,६५) गायन वादन करू नये असेही सांगितले आहे. (४-१५) व्यापार करावा; पण तीन वर्षाचा धान्याचा पुरवठा करण्या इतकाच करावा (४-६) अशी परवानगी दिली आहे. राजसेवा करू नये असे वर म्हटले आहे. पण उलट राजाचा मंत्री ब्राह्मण असावा. (७-५८-५९) न्यायाधीश ब्राह्मण असावा (८-११) असेही मनूने सांगितले आहे.
 मनुस्मृतीत असे परस्परविरोध पुष्कळच आहेत. मला वाटते मनूचा आनुवंशाचा शोध हा मनुस्मृतीतला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ते तत्त्व व्यवहारात आणताना मनू किंवा बहुशः मनूचे शिष्य अगदी एकांतिक झाले आहेत कोणच्याही नवीन तत्त्वाचा उत्पादक एकांतिकच असतो असे आपणास कार्ल मार्क्स, रूसो यांच्या उदाहरणांवरून दिसते. आनुवंशाचा इंग्रज प्रणेता सर फ्रॅन्सिस गाल्टन हाही असाच होता याची पुष्कळशी मते अगदी न पटणारी आहेत. त्याच्या ग्रंथाबद्दल कार्ल पिअरसनने जे म्हटले आहे तेच आपणांस मनुस्मृती बद्दल म्हणता येईल Hereditary Genius is one of the greatest books of the world, not so much by what it proves but by what it suggests. हेरिडिटरी जोनियस हा जगातला एक फार मोठा ग्रंथ आहे. त्यांतला प्रत्येक सिद्धांत खरा आहे म्हणून त्याला महत्त्व आले असे नसून त्याने सुचविलेल्या तत्त्वाला सर्व महत्त्व आहे.
 पण हा सुविचार देऊन वृत्तिसंकर हा अत्यंत निंद्य होय, याने कुलांचा समूळ नाश होतो. वगैरे जे मनूचे म्हणणे आहे ते अगदी अक्षरशः खरे आहे असे कांही लोक सांगत सुटले आहेत. त्याचा आता विचार करावयाचा आहे.
 वृत्तिसंकर केला म्हणजे एका जातीने दुसऱ्या जातीचा धंदा केला तर त्या लोकांचा निर्वंश होतो असे गो. म. जोशी सांगतात. पेशव्यांनी ब्राह्मण्य सोडलं व क्षात्रवृत्ती धरली. त्यामुळे त्यांचे कुल पांचव्याच पिढीला नष्ट झाले, हे उदाहरण त्यांनी घेतले आहे. (पान १६१) व असा कुलाचा नाश