पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३८)

असे आपण पाहिले. संकरविरोधी लोक आणखी एक मुद्दा पुढे आणीत असतात. त्यांचे मत असे की 'क' या समूहात एकादा विशिष्ट गुण वास करीत असला व त्याच्या रक्ताशी 'ख' या समूहाच्या रक्ताचे मिश्रण झाले तर त्याचा तो विशिष्ट गुण नाहीसा होईल. व 'क' ला जर आपला विशिष्ट गुण राखून ठेवावयाचा असेल तर त्याने आपल्या समूहांतलीच मुलगी केली पाहिजे.
 आनुवंशा संबंधीच्या चुकीच्या कल्पनांनी हे वरच्यासारखे समज निर्माण होत असतात. एक विशिष्ट कर्तृत्वशाली मानवसमूह घेतला तर त्याची पुढली पिढी किती कर्ती होईल एवढेच सांगता येईल. अमक्याच तऱ्हेने तिचे कर्तृत्व प्रगट होईल, असे सांगता येणार नाही. पिढ्यान्पिढ्या एकाद्या समूहात एकाच प्रकारचे कर्तृत्व राहाणार नाही असे नाही. पण परंपरेमुळे व परिस्थितीमुळे राहते. पारशांचे तसे उदाहरण आहे. पण ब्राह्मण, आरब, ज्यू यांची उदाहरणे अगदी निराळी आहेत. परिस्थिती बदलली की, निरनिराळ्या प्रकारचे कर्तृत्व तोच समाज दाखवू शकतो. आणि तरच त्याला पराक्रमी म्हणता येईल. म्हणजे एकाच समूहात मूलतःच अनेक प्रकारचे कर्तृत्व असते. म्हणून दुसऱ्या समूहाशी त्याचा संकर झाला तर त्याला आपले विशिष्ट कर्तृत्व जाईल ही भीती बाळगण्याचे मुळीच कारण नाही. कुलांच्या बाबतीत असेच आहे. एका कुलांत अनेक प्रकारचे कर्तृत्व असू शकते म्हणून त्यांतील लोकांनी कोणच्याही क्षेत्रांतल्या पण वरच्या दर्जाच्या कुळांशी विवाहसंबंध घडवून आणले म्हणजे झाले. अर्थात् रूपगुणसंस्कृती ही बंधने आहेतच हे केव्हाही विसरून चालणार नाही. व्यक्तीच्या बाबतीत या बाबतीतल्या मर्यादा आकुंचित होतात हे खरे. म्हणजे पुष्कळ वेळा गवयाचा मुलगा उत्तम गवई होतो. पण तो नियमाने होतोच असे नसल्यामुळे त्यांची जात करण्याइतके महत्त्व या विचाराला मुळीच नाही. म्हणून शरीर, मन व बुद्धि या दृष्टीने सुदृढ कुलाशी संबंध करावयाचा एवढी सावधगिरी बाळगली की, मग कोणच्याही कुळांत लग्न केले तरी गुणांचा लोप होईल ही भीती बाळगण्याचे कारण नाही.
 रक्तसंकराचा असा विचार झाला. आता वृत्ति संकराचाही थोडक्यात विचार करू. तोही रक्तसंकराप्रमाणेच हितावह आहे असे दाखवून देऊ. म्हणजे चातुर्वर्ण्याच्या बुडाशी असलेल्या दोन्ही कल्पना कशा फोल आहेत ते