पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३३)

संबंध तुघ्लख वंश हा तर तुर्क व रजपूत यांच्या मिश्रणानेच झाला होता. बाबर हा तुर्क व मोगल यांच्या संकरापासून झालेल्या वंशांत जन्मला होता. बाजीराव-मस्तानी यांचा मुलगा समशेर बहाद्दर व त्याचा मुलगा अलिझाबहाद्दर हेही पराक्रमी होते. समुद्रगुप्त हा चंद्रगुप्त व शूद्रकुळांतली लिच्छवी घराण्यांतली कुमारदेवी यांचा मुलगा. सर्वात महत्त्वाचे उदाहरण म्हणजे व्यासांचे. सर्व जगाला वंद्य झालेला हा पुरुष ब्राह्मण पिता व कोळीण माता यांच्यापासून झालेला आहे. या थोड्याशा उदाहरणावरून अगदी निर्णायक असे जरी काही सांगता येत नसले तरी संस्कृति व कर्तृत्व सारखे असताना अत्यंत भिन्न वंशातला संकर वाईट आहेच, असे म्हणण्यापूर्वी बराच विचार करावा लागेल एवढे तरी निदान वाटते. जेनिंग्ज ने म्हटले आहे की संकर निंद्य समजला गेल्यामुळे संकरज मुलाला वाईट वागविण्यात येते व त्यामुळे तो हीन ठरतो. त्याला जर चांगली संधी मिळाली तर तोही मोठ्या पदाला जाणे शक्य आहे. (बायॉलॉजिकल बेसीस ऑफ ह्यूमन नेचर; पांन २८७)
 हा विचार अत्यंत भिन्न रक्तासंबंधी झाला. त्यांचा संकर तज्ज्ञांना अमान्य आहे असे धरून आता जवळच्या रक्तामध्ये व जास्त निश्चित बोलावयाचे म्हणजे कोकणस्थ, देशस्थ, कऱ्हाडे, सारस्वत, प्रभु, क्षत्रिय, मराठे, इतर प्रांतातले ब्राह्मण, क्षत्रिय यांच्यामध्ये विवाह होण्यास या शास्त्रज्ञांची काही हरकत आहे काय ते पाहू.
 या विषयाचा विचार गाल्टन, एलिस, फ्रीमन, मॅकडुगल, इंग, कॅसल, डेव्हनपोर्ट या अनेक शास्त्रज्ञांनी केला आहे व जवळजवळच्या रक्तामध्ये संकर होणे अनिष्ट तर नाहीच पण ते समाजाला अत्यंत हितावह व आवश्यक आहे असे यांनी प्रतिपादले आहे. जेव्हा जेव्हा हे रक्तशुद्धीबद्दल बोलतात तेव्हा ते फक्त कुलाबद्दल बोलत असतात. म्हणजे एकदा फार भिन्न वंश सोडून दिले म्हणजे मग जात, वर्ग वगैरे विभाग ते मुळीच करीत नाहीत. फक्त ज्या कुलांतली मुलगी तुम्ही करीत असाल किंवा जेथे देत असाल, त्या कुलांत आनुवंशिक रोग मनोदौर्बल्य, वेडेपणा, काही दुष्ट प्रवृत्ती या नाहीत ना एवढे पहा, असे त्यांना सांगावयाचे आहे. अशी कुले चांगल्या कुलांचा नाश करतात. म्हणून जी चांगली कुले असतील त्यांनी विवाह करताना अत्यंत कळजी घेतली पाहिजे. पण हा उपदेश ते लोक कोकणस्थ किंवा देशस्थ,