पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३२)

नार्डिक x मंगोल हे संकर अगदी अनिष्ट असे गेटसने सांगितले आहे. स्पॅनिश लोकाचा अधःपात अशाच संकरामुळे झाला असे हेक्रॅफ्ट म्हणतो. मॅकडुगलने व इतर अनेक पंडितांनी शुद्ध युरोपी प्रजा व युरोपी x निग्रो यांची प्र॒जा यात तुलना करून संकरज लोक फार हीन प्रतीचे असतात, असे दाखविले आहे. कॅसल व डीन इंग यांनीही फार मित्र वंशांत संकर होऊ नये असेच सांगितले आहे. एवंच संकर प्रजेचा निर्वंश होतो किंवा तिच्यात विशिष्ट गुणधर्म येतात हे जरी कोणास मान्य नसले तरी अत्यंत भिन्न वंशातले संकर हीन प्रतीचे होतात व त्यामुळे ते अगदी अनिष्ट आहेत, असे सर्वांचे मत आहे.
 या ठिकाणी विचारासाठी एक मुद्दा सुचवावासा वाटतो. भिन्न वंशांतील संकर प्रजा नाकर्ती होते असे जे या पंडितांनी अनुमान काढले ते काढतांना त्यांनी अवलोकनासाठी जे वंश घेतले होते ते परस्परांपासून अत्यंत भिन्न होते हे खरे, पण जसे ते रक्ताने भिन्न होते तसेच संस्कृतीनं व दर्जानेही अत्यंत भिन्न होते. युरोपी हा संस्कृतीच्या व कर्तृत्वाच्या शिखरावर पोचलेला मनुष्य व अमेरिका आणि आफ्रिका येथील मूळचे लोक पायथ्यापर्यंतही न आलेले. यामुळे संकरप्रजा हीन व्हावी हे ठीकच आहे. पण जेथे संस्कृतीने व पराक्रमाने दोन्ही वंश सारखे, पण रक्ताने मात्र अत्यंत भिन्न अशा वंशांत जर संकर झाला तर त्यांची प्रजा निश्चयाने हीन होईलच, असे म्हणण्याइतका पुरेसा पुरावा पुढे आला आहे असे वाटत नाही. हिंदुस्थानच्या इतिहासात जो थोडासा पुरावा मिळतो तो या संकराला अनुकूलच आहे. आपल्याकडे तुर्क, अफगाण, व मोगल याचे रक्त रजपूत रक्ताशी वारंवार मिसळलेले आहे व त्याचे परिणाम वाईट तर नाहीच, पण बहु अंशी चांगलेच दिसून आलेले आहेत. अकबर, सेलीम, शहाजहान व अवरंगजेब या चारी मोगलांच्या स्त्रिया रजपूत होत्या. व सेलीम, खुश्रू कामबक्ष यांच्यासारखे त्यांचे मुलगे पराक्रमी होते. यूसफ आदिलशाहाची बायको मुकुंदराव म्हणून त्याचा मंत्री होता त्याची बहिण. त्यांचा मुलगा इस्माइल हा न्यायी, दूरदर्शी, रसिक व विद्वान होता असे इतिहासांत आहे. लोदी बहुलोल याची बायको एका सोनाराची मुलगी होती त्यांचाही मुलगा असाच होता. येथे अफगाण व मराठी रक्ताचे मिश्रण आहे. काश्मीरचे राज्य व राणी बळकावणारा शम्सुद्दिन व ती राणी कवलदेवी यांचे पांची पुत्र पराक्रमी होते.