पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३१)

लक्ष होती (पान २६१) केप कॉलनीमध्ये डच व हाटेटाट यांच्यात व मॅनिला येथे चिनी व स्पॅनिश यांच्यात संकर चालू आहे. प्रजा कमी नाही. ली व्हॅलियंट या प्रवाशाच्या तपासाअन्वये हाटेंटाट व युरोपी यांच्या संकरापासून मूळ हाटेंटाट व हाटेंटाट यांच्यातल्या विवाहापेक्षा जास्तच सतति होते. हॅबोर्नने ब्राझीलाबद्दल असेच सांगितले आहे. वाईट रोग, मुद्दाम केलेला संहार या आपत्ती नसतील तर जगांतला कोणचाही संकर निष्प्रज होत नाही असे कॅसलने म्हटले आहे. (जेनेटिक्स व युजेनिक्स सन १९२७ पान ३३) वर्क, वेल्थ व हॅपिनेस या पुस्तकात एच. जी. वेल्सनेही हेच मत प्रकट केले आहे. म्हणजे असे दिसते की, संकराने निर्वंश होतो असे कोणीच म्हणत नाही.
 अमक्या अमक्याच्या संकरापासून अमुक एक गुणाची प्रजा निर्माण होते, असे सांगण्याचा मनूचा प्रयत्न आहे व तो बरोबर आहे असे जोशी म्हणतात. व बुगलचा आधार घेतात. ब्राझीलमध्ये संकरापासून झालेले लोक कोणी चित्रकार, कोणी बजवय्ये, कोणी वैद्य असे होतात असे बुगलनं सांगितले आहे. अमक्या अमक्यापासून झाला तर तो चित्रकार, दुसऱ्या अमक्या दोघांमध्ये संकर झाला तर तो वैद्य अशी विभागणी बुगल करीत नाही. आणि कोणीच करीत नाही. 'गायनेझेस लोक व पोर्तुगीज यांचा ब्राझीलमध्ये संकर होतो. व ती संकरप्रजा सर्व बौद्धिक व नैतिक क्षेत्रांत पुष्कळच उन्नतीला गेलेली दिसते. कलेप्रमाणेच राजकारण व शास्त्र या क्षेत्रातही त्या लोकांची प्रगती झालेली दिसते. असे लॅगस या प्रवाशाचे मत ह्यूमन स्पेसीज या पुस्तकांत लेखकाने उध्दृत केले आहे. पण याहूनही स्पष्ट मुद्दा असा की वैद्यकी, चित्रकला, गायनवादन, वक्तृत्व हे गुण असंकरज प्रजेमध्येसुद्धां दिसतात. तेव्हा ते संकरज प्रजेचे वैशिष्ट्ये असे सांगण्यांत काय अर्थ आहे? जातिधर्म याचा पिंडगत गुण असा अर्थ मनूच्या मनात असेलच तर अमक्या संकर जातीचा अमका नैसर्गिक गुण हे त्याचे विवेचन सर्वस्वी चूक आहे असं दिसते.
 अत्यंत भिन्न वंशातील संकराची प्रजा नाकर्ती होते की काय याबद्दल फारसा वाद नाही. वरील प्रवाशांची वचने पाहिली तर ती तशी होत नाही असे त्यांचे मत आहे, असं दिसते. पण या बाबतीत बहुतेक सर्व पंडित असा संकर होऊ नये असे म्हणणारे आहेत. स्पॅनिश x चिनी, फ्रेंच x तांबडे इंडियन,