पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३०)

किंवा संस्कारामुळे असतील ते रक्तामुळे आहेत. या म्हणण्याला पुरावा नाही. मिश्र विवाह झाल्यास वाईट असे म्हणण्याला तर अगदीच नाही. म्हणूनच इंग्रज, फ्रेंच वगैरे लोकात आपापसात विवाह करू नये असे कोणचाही पंडित किंवा शास्त्रज्ञ सांगत नाही. रक्तशुद्धीची चळवळ आज युरोपात जोराने सुरू झाली आहे हे खरे; पण ती रक्तशुद्धी वरील प्रकारची नाही. ती फक्त कुळापुरती आहे. अमक्या जातीत किंवा वर्गात लग्न करणे निषिद्ध आहे, असे जर्मन लोकांखेरीज कोणी म्हणत नाही; त्याचे विवेचन पुढे येणारच आहे.
 आतापर्यंत असे दिसले की, आर्य, मंगोल, शिद्दी वगैरे अगदी साध्या डोळयाला स्पष्टपणे भिन्न दिसणारे वंश घेतले तर त्यांच्यापुरतं रक्त भिन्न म्हणजे काय हे सांगता येते. पण इंग्रज- फ्रेंचादी किंवा कोकणस्थ देशस्थादी जवळजवळचे समूह घेतले तर, म्हणजे बाह्यतः संस्कृतीने व रूपगुणांनी साधारण सारखे दिसणारे समूह जर घेतले तर त्यांच्यामध्ये रक्ते भिन्न आहेत म्हणजे काय, हे निश्चयाने सांगता येत नाही.
 पण हे जरी सांगता येत नसले तरी कोणच्याही कारणामुळे का होईना, जे समूह निरनिराळे वर्ग म्हणून किंवा जाती म्हणून किंवा वंश म्हणून आज मानले गेले आहेत, त्यांच्यामध्ये रक्तसंकर होणे कितपत इष्टानिष्ट आहे याचा आपण विचार करू. प्रथमतः डोळ्याना स्पष्टपणे दिसत असल्यामुळे जे वंश अगदी भिन्न मानले गेले आहेत त्यांचा संकर झाला तर काय होईल ते पाहू.
 संकर वाईट असे म्हणणारे असे सांगतात की १ संकराने निर्वंश होतो. २ संकरज प्रजा नाकर्ती होते. ३ व संकरप्रजेच्या अंगी विशिष्ट तऱ्हेचे दुर्गुण निर्माण होतात. अत्यंत भिन्न वंशात संकर झाला तर वरील वरील अनिष्ट परिणाम घडून येतात की काय, हे त्या क्षेत्रातल्या अभ्यासकांच्या म्हणण्यावरून ठरवू.
 ए.डी. काट्री फेजेस याने ह्यूमन स्पेसीज (सन १८७९) या पुस्तकात मेक्सिको, पेरू, आफ्रिकेतले प्रांत या ठिकाणी कित्येक वर्षे राहून आलेल्या प्रवाशांचे अनुभव दिले आहेत. यावरून या प्रश्नावर बराच प्रकाश पडेल. वेस्ट इंडीज, मेक्सिको व पेरू या देशांत आज ३०० वर्षे युरोपीय व तद्देशीय यांच्यामध्ये संकर चालू आहे. तरी १८७९ साली तेथील प्रजा एक कोटी ऐशी