पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२९)

रक्त आहे. फ्रेंचात नार्डिक २५ अल्पाइन ४० व मेडिटरेनियन ३५ असे प्रमाण आहे. व जर्मन लोक अगदी अल्पाइन (नॅशनल वेलफेअर अँड डिके पान १५१) अल्पाइन लोकांत विभतीपूजा फार, ते लोकशाहीला नालायक असे मॅक डुगल म्हणतो; व कैसर आणि हिटलर यांच्या सत्तेची उदाहरणे देतो. पण इंग्लंडांत सॅक्सन लोक जर्मनीतूनच आले असल्यामुळे त्या दोघांच्या म्हणजे इंग्रज व जर्मन, यांच्या प्रवृत्तासारख्या आहेत असे इतर कांही जणांचे म्हणणे आहे. ज्या नॉर्मन लोकांचा प्रभाव इंग्लंडमध्ये फार आहे, असे म्हणतात, ते नॉर्मनच मुळात मिश्र रक्ताचे होते व त्यांचा वुइल्यम हा अकुलीन बाईचा मुलगा होता असे हॅवेलाक् एलिसने सांगितले आहे. या सर्व माहितीवरून रक्ते भिन्न आहेत व अमक्या रक्ताचे अमके वैशिष्टय हे कितपत निश्चयाने सांगता येईल, याचा वाचकांनीच विचार करावा. युजेनिक्स रिव्ह्यू या मासिकाच्या १९३५ च्याजानेवारीच्या अकात या वादावर एकाने फार सुंदर टीका केली आहे. तो म्हणतो, ऑस्ट्रियामध्ये गुंथरने शे. ३५-३५ नार्डिक रक्त आहे असे मागे लिहिले होते; पण तेव्हा जर्मनी व ऑस्ट्रिया यांचे भांडण झाले नव्हते. आता बहुतेक हे प्रमाण कमी होईल.
 वर सांगितलेच की युरोपात रक्ताचे मिश्रण चालू आहे, याबद्दल वाद मुळीच नाही. तरी पण प्रत्येक जातीचे वैशिष्ट्य टिकून आहे असे सगळे म्हणतात. काही शतके गट निराळे राहिले तर वैशिष्ट्य वाढत जाते, असे म्हणणाऱ्या गेटसलाही मिश्रविवाहाने वैशिष्ट्य नाहीसे होते असे वाटत नाही. तो म्हणतो आज एक हजार वर्षे सारखे रक्तमिश्रण चालू असूनही इंग्रजात भिन्नभिन्न वांशिक गुण अजूनही दिसून येतात. (हेरिटिटी व युजेनिक्स पान २३२)
 या सर्व विवेचनावरून निघणारा निर्णय, मला वाटते, अगदी स्पष्ट आहे. युरोपात पांची वंशांचे मिश्रण सारखे चालू आहे. अमुक एक वंश अमक्या ठिकाणी जास्त प्रमाणात आहे, असे निश्चयाने सांगता येत नाही. अमक्या वंशाचा अमुक गुण याबद्दलही एकमत नाही. आणि इंग्रज, फ्रेंच, जर्मन, इटालियन यांच्यात स्वभावाचे भिन्न कल असले तरी रक्तमिश्रणाचा व त्याचा काही एक संबंध नाही. रक्ते मिसळली तरी विशिष्ट गुण टिकून राहू शकतात. भिन्न गुण असलेच तर परिस्थितीमुळे असतील, परंपरेमुळे,