पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२८)

व हिंदुस्थानांत बेटीबंद जातिभेद असला तरी त्या जातीची रक्ते भिन्न म्हणजे काय, हेही कोणी सांगितले नाही. पण वर सांगितल्याप्रमाणे हिंदुस्थानांत रक्ते भिन्न आहेत, या बोलण्याला, भाषेच्या सोयीपुरता तरी अर्थ आहे. युरोपांत तर यापेक्षाही गोंधळ आहे. युरोपांत नॉर्डिक, मेडिटरेनियन, डिनॅरिक, अल्पाइन व ईस्ट वाल्टिक असे पांच भिन्न वंश आहेत असे म्हणतात त्या सर्वांचे भिन्न गुणही, म्हणजे गुणही म्हणजे तोंडवळा, केस, उंची, स्वभाव, बुद्धी हे गुणही गूंथुर याने रेशल एलेमेंटस् इन युरोपियन हिस्टरी या पुस्तकात दिले आहेत.
 रक्ताचे हे विशिष्ट गुणधर्म सांगून त्यानेच पुढे म्हटले आहे की, इतिहासपूर्वकालापासून या सर्वांचे सारखे मिश्रण होत आहे. तरी पण मौज अशी की, युरोपांत कोणच्या देशात कोणचे रक्त प्रबळ आहे हे सांगण्याची त्याला हौस आहेच. डीन इंग, मॅक डुगल, गेट्स वगैरे आणखी अनेक पंडितांनी याचा विचार केला आहे. मिश्रण सारखे अगदी अनिर्बंध चालू आहे याबद्दल फारसा कोणाचा वाद नाही; पण तरीसुद्धा आमच्या देशात अमुक रक्त प्रबळ आहे हे सांगण्यासाठी त्यांचा अट्टाहास आहे आणि आश्चर्याची गोष्ट अशी की, त्यांच्यात मुळीच एकवाक्यता नाही. ब्रह्म मुळीच दिसत नसल्यामुळे ते त्रिकोणी, चौकोनी की वाटोळे याबद्दल वाद होणे साहजिक आहे. पण मोजमापे, फोटो, कर्तृत्वाचा इतिहास इतकी सामुग्री पुढे घेऊन बसल्यानंतर ज्याला एक नार्डिक म्हणतो, त्यालाच जर दुसरा अल्पाइन म्हणू लागला तर त्या फरक सांगण्यात काही जीव नाही हे उघड आहे. नॉर्डिक हा वंश या पांचांमध्ये श्रेष्ठ आहे, याबद्दल सर्वांचे एक मत आहे. जगात जथे कोठे पराक्रम झाला असेल तेथले लोक मुळांत नॉर्डिकच असले पाहिजेत, हा गुंथुरच सिद्धांतच आहे. हिंदु हे मुळांत नॉर्डिकच होते, असे तो म्हणतो आणि असा हा प्रभावशाली नॉर्डिक वंश त्याच्या मते आज मुख्यत्वेकरून जर्मनीत आहे. तो अगदी शुद्ध आहे असे नव्हे. पण जर्मन रक्तांत मोठे प्रमाण नॉर्डिक रक्ताचे एवढे खास. डीन. इंगच्या मते इंग्लंमध्ये नार्डिक रक्ताचे प्रमाण फारच मोठे आहे. व वाटोळ्या डोक्याची अगदी कनिष्ठ जात जी अल्पाइन त्या जातीचे जर्मन लोक आहेत, याबद्दल त्याला संदेहच नाही. (औट स्पोकन एसेज पान ८३) मॅक डुगलच्या मताने इंग्रजांत शे. ७० नार्डिक व ३० मेडिटरेनियन