पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२७)

सांगितले म्हणजे यांचीही रक्ते भिन्न आहेत काय व असल्यास ती कशावरून असा प्रश्न निर्माण होतो.
 हिंदुस्थानात रक्ते भिन्न आहेत याचा एक ढोबळ अर्थ तरी सांगता येईल. येथे ज्या दोनचार हजार जाती आहेत, त्यांच्यामध्ये आज दोन अडीच हजार वर्षे लग्ने होत नाहीत. आणि म्हणूनच त्यांची रक्ते भिन्न आहेत असे म्हणावे असे कोणी म्हणतात. एकाच रक्ताच्या लोकांचे दोन गट केले व एकमेकांत लग्ने न करता ते गट बरीच वर्षे राहिले तर त्यांच्यात काही वैशिष्ट्य निर्माण होते, त्यांच्या रक्तांत भिन्नपणा येतो, असे गेट्सने म्हटले आहे. (हेरीटिटी व युजेनिक्स) व त्याच्याच आधाराने गो. म. जोशी यांनी पण म्हटले आहे. पण गेट्सने याचा अर्थ कोठेच स्पष्ट केलेला नाही. व जोशांनी फक्त करता येईल असे म्हटले आहे. (पान ८९) एके ठिकाणी (पान २३१) त्यांनी कोकणस्थ व देशस्थ यांच्यातील वैशिष्ट्ये दाखवावयाचा प्रयत्न केला आहे. तो क्षणभर खरा मानला तरी दोन हजार जातींपैकी निदान सातआठशे जातीची तरी वैशिष्ट्ये म्हणजे इतरात नाहीत. असे त्यांच्या ठायी स्पष्टपणे आढळून येणारे गुण दाखविल्यावाचून ही इतकी रक्ते भिन्न आहेत असे म्हणता येणार नाही.
 निसर्गातच रक्ते भिन्न करण्याची प्रवृत्ति आहे. असे जोशांनी आपल्या पुस्तकांत म्हटले आहे. गेट्सच्या पुस्तकांतून त्यांनी एक उदाहरण घेतले आहे. सेवल बेटांत प्रोर्तुगिजांनी काही घोडे नेले. तेथे ते जंगलांत वाढले. पुढे तीनशे वर्षांनी गिल्पिन नावाचा प्रवासी तेथे गेला. त्याला असे आढळले की त्या घोड्यांची संतति सदा भिन्न गटात राहते. व त्यांना एकत्र हाकून आणले तरी ते घोडे फिरून सहा ठिकाणी विभक्त होतात. इतके सांगून जोशांनी मुळांत नसतांना 'ते घोडे सहभोजन व सहविवाह करण्यास तयार नव्हते' असे खोटेच वाक्य अवतरण चिन्ह देऊन त्याच्या तोंडी घातले आहे. गिल्पिन किंवा गेट्स कोणीही तसे म्हणत नाही. मुळांत नसतांना अवतरणांत वाक्य घालणे हे चूक आहे व गणितागत पद्धतीच्या चाहत्यांनी एकाच उदाहरणावरून स्वतंत्रपणे आपणच अनुमान काढणे अशास्त्रीय आहे.
 निसर्गातच रक्त भिन्न करण्याची योजना आहे, म्हणजे एकदा एक असलेली रक्ते भिन्न करण्याची योजना आहे असे कोणी सिद्ध केलेले नाही