पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२६)

 बट्रांड रसेल याने आपल्या सायंटिफिक औटलुक या ग्रंथात असेच म्हटले आहे, असे रा. गो. म. जोशी यांचे म्हणणे आहे व स्वतः जोशी यांनी आपल्या हिंदूसमाजरचनाशास्त्रांत तर देशस्थ, कोकणस्थ या पोटजातीत सुद्धा विवाह होणे अनिष्ट आहे, असे जोराने प्रतिपादले आहे (पान २३१)
 येणेप्रमाणे या पंडितांनी निंद्य, निषिद्ध व भयावह मानलेला जो रक्तसंकर त्याबद्दल म्हणजे तो घडवून आणणे हितावह आहे की विनाशक आहे, याबद्दल या निबंधांत विचार करावयाचा आहे.
 संकराचा विचार करू लागताच संकर म्हणजे काय असा प्रश्न पुढे येतो. दोन भिन्न रक्तांच्या घराण्यांतील स्त्रीपुरुषांचा विवाह असे उत्तर चटकन् देता येईल. पण भिन्न रक्त म्हणजे काय हाच तर महत्त्वाचा प्रश्न आहे. भिन्न रक्त दाखवावयाचे म्हणजे ज्या दोन जाती किंवा वंश यांच्याबद्दल आपण बोलत असू, त्यांच्यामध्ये शरीराची ठेवण, मनाचे कल व बुद्धीची ऐपत ही एकमेकांहून फार निराळी आहे, असे दाखविले पाहिजे व असे दाखविता आले तरी, पुढे त्या दोन रक्तांचे मिश्रण झाले तर पुढील संतती हीन प्रकारची होईल हे सिद्ध करता आले पाहिजे. नाहीतर वरील तिन्ही गोष्टी दाखविता आल्या तरी त्यावरून त्या दोन जातींमध्ये रक्तसंकर अनिष्टच आहे असे निश्चयाने म्हणता यावयाचे नाही.
 काही रक्ते म्हणजे काही वंश परस्परांपासून अगदी भिन्न आहेत, हे साध्या डोळ्यालाही दिसते. इंग्रज व शिद्दी यांच्यामध्ये शरीर, मन व बुद्धी यांत कोणच्याही प्रकारचे साम्य नाही व त्या दोघांमध्ये मिश्रण व्हावे, असे कोणीही मनुष्य म्हणत नाही. इंग्रज व निग्रो किंवा आफ्रिकेतल्या इतर जाती, किंवा स्पॅनिश व दक्षिण अमेरिकेतल्या जाती, किंवा ब्राह्मण व हिंदुस्थानांतल्या अस्पृष्ट जाती, यांच्यामध्ये विवाह घडवून आणावे की काय, असा प्रश्न आज कोणी नेटाने उपस्थित करीत नाही. त्याचाही विचार करावयाचा आहेच. पण तो प्रश्न जरा गौण आहे. या प्रश्नाला फार महत्त्व येते ते इंग्रज, फ्रेंच, जर्मन ग्रीक, इटालियन वगैरे युरोपांतले गट किंवा देशस्थ, कोंकणस्थ, कऱ्हाडे, सारस्वत, प्रभू, क्षत्रिय, मराठे हे महाराष्ट्रीय गट यांच्यामध्येही रक्तमिश्रण होऊ नये असे सांगतात त्यावेळी. संस्कृति, रूप, गुण, परंपरा या बाबतीत या दोन संघांतील गटांमध्ये बरेच साम्य आहे. यांचे मिश्रविवाह निषिद्ध म्हणून