पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



रक्तसंकर व वृत्तिसंकर


 फार पुरातन काळापासून आपल्याकडे संकर हा अत्यंत निंद्य मानला आहे. एकाद्या समाजाला फार भयंकर भीती घालावयाची असली तर वर्णसंकर होईल असे म्हटले की झाले. पुराण कालांत संकर मान्य होता, पण त्याचे दुष्परिणाम दिसल्यामुळे स्मृतिकांरांनी तो निषिद्ध ठरविला व याज्ञवल्क्याच्या काळापर्यंत अनुलोम, प्रतिलोम वगैरे सर्व प्रकारचे विवाह बंद झाले. दोन रक्ताच्या मिश्रणासंबंधी आजही जवळजवळ तीच भावना आपल्याकडे कायम आहे. मिश्रविवाहाची चळवळ चालू असली तरी दोन पोटजातीत विवाह होण्यास हरकत नाही, असे काही सुशिक्षितांचे मत व त्याहूनही थोड्यांची कृती यापलीकडे मजल गेलेली नाही. यावरून आपल्या समाजाला मिश्रविवाहाची अजून भीती वाटते असे दिसते.
 आपल्या पूर्वजाप्रमाणे आज जर्मन लोकांनीही रक्तशुद्धीची चळवळ सुरू केली आहे. जाती, पोटजाती, उपपोटजाती पाडण्याचा हिटलरचा विचार आहे की नाही, ते अजून कळले नाही. पण आर्यन् रक्त सोवळे ठेवण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत एवढे खास. पण त्या आर्यन रक्तांत हिंदूंची तो गणना करीत नाही; एवढेच नव्हे तर फ्रेंच किंवा इंग्रज हेही त्यांत तो धरीत नाही.
 'रायव्हलस ऑफ व्हाईट मॅन' या निबंधांत डीन इंग याने म्हटले आहे की, 'सर्व समाज एका पातळीवर आणूं पाहाणाऱ्या साम्यवादापेक्षा किंवा लोकशाहीपेक्षा युरोपात परवापर्यंत असलेली जातिसंस्थाच समाजाचे तारण करू शकेल, असे वाटते. मात्र ती जातिसंस्था हिंदुस्थानांतल्याप्रमाणे कडक असावी असे मला वाटत नाही. (औटस्पोकन एसेज पान २३०) या लेखकाने आपल्या या मताची चर्चा कोठेच केलेली नाही. वर सर्व निबंधात जातिसंस्थेचा कोठे उल्लेखही नाही. पुढील निबंधात रक्तसंकर हितावह आहे असे यानेच सांगितले आहे. तरी पण 'A modified caste system may have a greater survival value than either democracy or socialism' असे त्याने म्हटले आहे हे खरे.