पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२३)

येईल तर सर्वांना सारखी संधी (Equality of opportunity), शिक्षण, सामाजिक सुधारणा यातल्या कशालाच अर्थ नाही. पण हे एकांतिक मत टिकणे शक्य नाही. उलट वाटेल त्या मुलाला शिक्षण व संस्कार या साधनांनी वाटेल त्या पदाला चढवता येईल, हेही मत तितकेच एकांतिक आहे
 (Study of America's one thousand leading Scientists' families; Popular Science monthly 1915)
 कोणाही समंजस व अनाग्रही माणसाला हे म्हणणे पटेल असे वाटते. आनुवंशाला मुळीच किंमत नाही असे मी म्हणत नाही. त्यामुळे उच्च कुलांना जपू नये असेही नाही. उच्च कुलांना जपणे, त्यांच्या रक्तांत हीन रक्ताची मिसळ न होऊ देणे याबद्दल समाजाने फार खबरदारी घ्यावयास पाहिजे यांत शंकाच नाही; पण एकदा ज्यांना उच्च म्हटले ती कायम उच्च व हीन ही कायम हीन राहतात हा समज चुकीचा आहे. त्यामुळे चातुर्वर्ण्य ही समाजव्यवस्था चुकीची व घातुक ठरते.
 हिंदुस्थानचा जो अध:पात झालेला दिसतो त्याला चातुर्वर्ण्य व जातिभेद सर्वस्वी जबाबदार आहेत, असेही मला म्हणावयाचे नाही. पण अनेक कारणांपैकी ते एक आहे यात शंकाच नाही. सर्वांच्या गुणविकासाला येथे संधीच न मिळाल्यामुळे येथे गुणांची पैदास फारच थोडी होऊ लागली. ब्राह्मणादि जातीत जास्त कर्ते पुरुष निर्माण होतात हे जरी खरे असले तरी इतरांना ब्रह्मक्षत्रांची कर्मे करू देण्यास काहीच हरकत नाही. ब्रह्मक्षत्रांनी इतके गुण निर्माण केले की आता जास्त पराक्रम झाला तर तोटा होईल, अशी स्थिती खास आलेली नाही. त्यामुळे प्रत्येकास वाटेल त्या क्षेत्रात कर्तृत्व दाखविण्यास मोकळीक असणे व जे घराणे काही पिढ्या तसे दाखवील त्याला श्रेष्ठ समजून त्याला जपणे हे समाजरचनेत आद्य तत्त्व असावयास पाहिजे.
 हॉल्डेनने आपल्या Inequality of Man या निबंधाच्या शेवटी हेच सांगितले आहे. 'विषमता दिसून आल्याने 'सर्वांना सारखी संधी' हे तत्त्व कमी तर नव्हेच पण जास्तच जोराने प्रतिपादावयास पाहिजे' असे तो म्हणतो.
 आपला समाज चातुर्वर्ण्य पूर्णपणे पाळण्याइतका वेडगळ कधी होता का नाही ते नक्की सांगता येत नाही. पण महाराष्ट्रांत गेल्या एक हजार वर्षात तरी ते बहुतेक सर्व वर्णांनी व्यवहारांत तरी मोडले आहे.