पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२२)

असे या सर्व शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. (जेनिंग्ज पान ३०१-३०२).
 वंशाच्या गुणधर्मात कधीच फरक पडत नाहीत हा सिद्धांत हीन जातीना अत्यंत निराश करणारा आहे. व त्यामुळे दैवाला हात लावण्यापलीकडे त्यांना काहीच करता येण्यासारखे नाही असा समज पसरण्याचा संभव आहे. आणि याला जीवनशास्त्राचा आधार आहे, असे काही वेडगळ लोक सांगत फिरू लागल्याने समाजाचे मोठे नुकसान होईल असे वाटते. याबद्दल जेनिंग्ज् म्हणतो-
 The fallacy appears popularly in the notion of inevitableness, the fatality of what is heredity.
पण हा निराशाजनक विचार अगदी निराधार आहे असे त्याने स्पष्ट सांगितले आहे.
 वर्णाच्या बाबतीत जे दिसले तेच कुलांच्याही बाबतीत दिसून येईल. थोर कुलांतच थोर व्यक्ती निर्माण होतात असे नाही आणि थोर कुलात थोर व्यक्ती निर्माण होतातच असेही नाही. पिल्ग्रिम्स प्रोग्रेसचा कर्ता बन्यन हा कल्हईवाल्याचा मुलगा, कोलंबस कोष्ट्याचा, क्रॉमवेल कलालाचा, डेफो खाटकाचा, डेमॉस्थेनीस शिकलगाराचा, होमर शेतकऱ्याचा, शेक्स्पीयर विणकऱ्याचा, वूल्से खाटकाचा, साक्रेटीस पाथरवटाचा, वाशिंग्टन शेतकऱ्याचा मल्हारराव धनगराचा, राणोजी स्वतः पैजार उचलणारा, ही 'अस्पृष्टांच्या प्रश्नांत' माटे यांनी दिलेली यादी पाहिली व त्यांत कोळ्याचा वाल्मिकी, लोहाराचा मुसोलिनी, चांभाराचा स्टॅलिन्, सुताराचा धंदा स्वतः करणारा हिटलर, पाकिटावर पत्ते लिहून पोट भरणारा मॅक्डोनॉल्ड, प्रथम हुजऱ्या असून पुढे फील्ड मार्शल झालेला राबर्टसन् यांची भर घातली म्हणजे 'यस्मिन् कुले त्वमुत्पन्नः गजस्तत्र न हन्यते' हा पशूंचा सिद्धान्त माणसांना लावणे कसे चूक आहे ते ध्यानात येईल. व आनुवंशाचा सिद्धांत काही एका मर्यादेबाहेर खेचणे किती हास्यास्पद आहे ते कळून येईल.
 कॅटेल नावाच्या अभ्यासकाने हेच मत दिले आहे. तो म्हणतो :-
 थोर घराण्यांतच थोर व्यक्ती निर्माण होतात हे खरे असले तर एक उच्च वर्ग समाजात कायमचा निराळा ठेवण्यास ते पुरेसे कारण आहे. आई- बापांच्या पिण्डगत गुणावरून ती व्यक्ती पुढे कशी होईल हे निश्चित ठरवता