पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१६)

 एक जात किंवा एक कुल शतकानुशतके सारखे कार्यक्षम राहील, असे मानून तिच्यावर एकादे महत्त्वाचे कार्य कायमचे सोपविणे हे इतिहास व शास्त्र या दोघांनाही कसे संमत नाही हे दाखविले. चातुर्वण्याच्या बुडाशी असलेल्या दुसऱ्या दोन्ही कल्पनाही कशा भ्रामक आहेत ते आता पाहू.
 वर्णव्यवस्था कायमची करून टाकण्यात दुसरे असे गृहीत धरावे लागते की मूळ व्यवस्थेच्या वेळी ब्राह्मण हे बुद्धीसाठी व क्षत्रिय शौर्यासाठी जर निराळं केले तर त्यांच्यांत अनुक्रमे बुद्धी व शौर्य गुणांखेरीज अन्य गुण दिसणार नाही. व नियत कर्माखेरीज अन्य कर्मे त्यांस साधणार नाहीत, असे गृहीत न धरावे तर एक तर आनुवंशाला काहीच किंमत नाही असे होईल. व दुसरे असे की नियत गुणांखेरीज भिन्न गुण त्या वर्णात उत्पन्न होऊ शकतील असे धरूनही मनूने त्यांचा विकास होऊ न देण्याची व्यवस्था केली असे म्हणावे लागेल. पण मनूवर असला आरोप करावा असे मला वाटत नाही. आनुवंशावरील असीम विश्वासामुळे एका वर्णात अन्य गुण निर्माण होऊ शकणार नाहीत असेच त्याला वाटत असावे व म्हणूनच त्याने कायमची व्यवस्था केली असावी. पुढील अनुभवाने ती कल्पना चूक ठरल्यामुळे ती व्यवस्था बदलणे हे पुढीलांचे कर्तव्य होय. यात मनूवर काही दोषारोग करिता येईल असे मला वाटत नाही. पण मनूवर दुष्टपणाचा आरोप करणारे जसे त्याचे शत्रू होत, तसेच आपल्या कल्पना त्याच्यावर लादून त्याचा आधार घेताना हास्यास्पद करून टाकणारे अर्वाचीन सवाजशास्त्राज्ञही त्याचे शत्रुच आहेत असे मला वाटते.
 एक वर्ण एकच गुण दाखवील, अन्य कर्म त्यास साधणार नाही ही कल्पना पहिल्या कल्पनेइतकीच खोटी आहे. महाराष्ट्रातील ब्राह्मणवर्ग पहा. कर्तृत्वाची एकही शाखा अशी नाही की ज्यात ब्राह्मण अलौकिक पदाला चढला नाही. भास्कराचार्य, ज्ञानेश्वर, रामदास, रामचंद्रपंत अमात्य, रामशास्त्री प्रभुणे, डॉ. भिसे, रँ. नारळीवर, प्रि. महाजनी, डॉ. कोकटनूर, श्रीमंत कुवलयानंद, नाना फडणीस, आगरकर, डॉ. गोखले (अमेरिका), टिळक, रानडे, राजवाडे, लिमये (निधोन) हे लोक ब्राह्मणांच्या बुद्धिवैभवाची साक्ष देतील. पेशवे, प्रतिनिधि, पटवर्धन, पानसे, गोखले, मेहेंदळे, बिनिवाले, विंचुरकर ही घराणी क्षात्रतेज दाखवितील. रामचंद्र नाईक परांजपे (सावकार)