पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१७)

बारामतीकर जोशी, गोखले, गद्रे, किर्लोस्कर, ओगले, टिकेकर हे लोक सरस्वतीप्रमाणेच लक्ष्मीलाही ब्राह्मण प्रसन्न करू शकेल हे सिद्ध करतील. त्रैवर्णिकांची ही त्रिविध विद्या तर ब्राह्मणात दिसतेच; पण ज्या कलांची उपासना ब्राह्मणाने मुळीच करू नये. असे मनूने सांगितले आहे (३-६४) त्याही हस्तगत करून ब्राह्मण तेथेही शिखराला गेला आहे. शिल्पकार करमरकर, फडके, नट गणपतराव जोशी, दाते; गवई पलुस्कर, गंधर्व, बखले; नकलाकार भोंडे या मंडळीनी कलांचे क्षेत्रही व्यापले आहे. अमुक एक वर्ण अमकेच गुण दाखवितो हे समजणे किती चूक आहे व त्या अन्वये त्याला इतर कामे करण्याची मनाई करणे कसे घातुक आहे. हे सिद्ध करण्यास आणखी पुरावा पाहिजे काय?
 आणि पाहिजेच असला तर ज्यू लोकांचा इतिहास पहा. युरोपमध्ये प्रत्येक देशांत यांचा अनन्वित छळ झाला. प्रत्येक ठिकाणाहून त्यांना हाकालण्यात आले. त्यांच्या कत्तलीही झाल्या. समाज त्यांना जवळजवळ अस्पृश्य लेखी व ते अगदी अस्सल कवडीचुंबक व उलट्या काळजांचे सावकार आहेत, असे म्हणून त्यांना अगदी खायला उठे. पण त्यांचा छळ बंद झाल्याबरोबर त्यांनी एवढे अलौकिक बुद्धिवैभव प्रगट केले की, आज जगातल्या प्रत्येक सुशिक्षिताचा श्वासोच्छ्वास ज्यूंनी चालविला आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. रिलेटिव्हिटीचा सिद्धांत सांगणारा जगन्मान्य गणिती आइन्स्टाइन्, अंतर्मन- बहिर्मन ही उपपत्ति बसविणारा मानसशास्त्रज्ञ फ्रॉइड, एलान- व्हाइटल हे तत्त्व सांगणारा तत्त्ववेत्ता बर्गसन्, व ज्याचे अर्थशास्त्र जग आकंठ पिऊन राहिले आहे, तो कम्युनिझमचा प्रणेता कार्ल मार्क्स हे सर्व ज्यू आहेत. डिझरायलीसारखे राजकारणी यांच्यात होतात. युरोप-अमेरिकेची कित्येक न्यायासने यांनी मंडित केली आहेत. फ्रेड्रिक एञ्जल्स, त्रात्स्की हेही ज्यूच आहेत. राशेल, बर्नहार्ट यांसारख्या नट्यांनी रंगभूमीवरही अलौकिक यश मिळविले आहे. एकीकडे युरोपात ज्यू असे वैभवाला चढत असताना इकडे कोकणात कुलाबा जिल्ह्यांतील आवास गावी त्यांचेच पुष्कळ जातभाई लंगोट्या नेसून तेलाचा धंदा करीत आहेत.
 मूळ विभागणीच्या वेळी जे गुण ज्या वर्णात दिसतात, ते त्यात कायम टिकत नाहीत व त्याशिवाय अन्य गुणांची निपज त्यात होते, या दोन गोष्टीं-