पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१३)

आजमितीला कॅमेरार, डरहॅम वगैरे काही अपवाद सोडून दिले तर बाकीचे सर्व शास्त्रज्ञ पिण्डगत गुणच फक्त संक्रांत होतात, संस्कारप्राप्तगुण संक्रांत होत नाहीत असेच मानतात.
 कित्येक पिढ्याने का होईना पण वंश किंवा जात संस्काराने सुधारता येईल या आशेला शास्त्रज्ञ असा धक्का देत असल्यामुळे मूळच्या निराशेत अधिकच भर पडते. तेव्हा ही निराशा खरोखरीच साधार आहे की काय याचा कसोशीने विचार व्हावयास पाहिजे.
 थोर घराण्यांत थोर व्यक्ती निर्माण होतात व संस्कारप्राप्त गुण संक्रात होत नाहीत, हे दोन सिद्धांत लक्षात घेऊनच आपली चातुर्वर्ण्ययुक्त समाजरचना घडविलेली आहे, असे सांगितले जाते. म्हणून ती समाजरचना कितपत यशस्वी होईल, याचा प्रथम विचार करू.
 विद्यावृद्धी, संरक्षण, वाणिज्य इत्यादी निरनिराळ्या कार्यांसाठी लागणारे निरनिराळे गुण भिन्न भिन्न मानवसमूहांत मनूला दिसुन आले, ते आनुवंशिक आहेत असे त्याने पाहिले व म्हणून त्या त्या समूहावर- वर्णावर— ती ती जबाबदारी मनूने टाकली; व त्यांच्या गुणात बिघाड होऊ नये म्हणून त्यांनी आपआपसांत विवाह करू नयेत असे त्याने ठरवून दिले. त्याचप्रमाणे प्रत्येक वर्णाचे उपजीविकेचे साधनही त्याच्या कार्याला योग्य असे सांगून ते इतरांनी घेऊ नये, म्हणजेच एका वर्णाचा धंदा दुसऱ्याने करू नये, असाही निर्बंध त्याने घातला. या दोन निर्बंधांमुळे झालेली रचना तेच चातुर्वण्य, अशी ही कल्पना आहे.
 वरीलप्रमाणे समाजरचना करताना पुढील गोष्टी गृहीत धराव्या लागतात. आरंभी व्यवथा करताना,
 १) ज्या वर्णावर त्याच्या गुणाअन्वये जी जबाबदारी टाकली असेल, ती पार पाडण्यास तो वर्ण कायम- कितीही शतके लोटली तरी तितकाच समर्थ राहील. त्याला कधीही दौर्बल्य येणार नाही.
 २) एका वर्णात मनूने जे गुण पाहिले त्या गुणांखेरीज अन्य गुण त्या वर्णात कधीही दिसणार नाही.
 ३) आरंभी जो मानवसमूह हीन, नाकर्ता, शुद्र म्हणून गणला गेला असेल त्याच्या अंगी पुढे कधीही कर्तृत्व प्रकट होणार नाही.