पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१२)

आनुवंश व त्या अन्वये केलेली समाजरचना यांचा विचार करावा असे ठरविले आहे. पण त्यापूर्वी दुसऱ्या एका महत्त्वाच्या मुद्दाचा विचार करतो.
 जन्मतः सर्व मानव सारखे नसले तरीही अनुवंशाला- घराण्याला- किंमत द्यावयास नको असे म्हणणारा एक पक्ष आहे. त्याचे म्हणणे असे की जरी जन्मतः एक श्रेष्ठ, एक कनिष्ठ, असा भेद असला तरी शिक्षण हे असे अमोघ साधन आहे की त्याच्या साह्याने ही मूळची विषमता आपणास सहज काढून टाकता यईल व एका पिढीत हे साधले नाही तरी अनेक पिढ्यांनी साधेल यात शंकाच नाही.
 पण शास्त्रज्ञ या म्हणण्याचा पाठपुरावा करीत नाहीत. तर शिक्षणाने किंवा इतर संस्कारांनी पिढ्या सुधारणे शक्य नाही, असेच आजच्या जवळ- जवळ सर्व शास्त्रज्ञांचे मत आहे. एक उदाहरण घेऊन त्यांचे म्हणणे स्पष्ट करू.
 समजा 'क' ही व्यक्ती गाण्याच्या घराण्यातील आहे. आनुवंशाच्या नियमाने 'क' च्या अंगी साहजिकच थोडे गाननैपुण्य येणार. आता असे समजू की 'क' ने आपल्या हयातीत अभ्यासाने गायनाखेरीज इतर काही विद्या किंवा गुण (उदा. अचूक निशाण मारणे) हस्तगत केला. शास्त्रज्ञ या दोन गुणांना दोन निरनिराळी नावे देतात. परंपरेने म्हणजे घराण्यांतूनच आलेला गाननैपुण्य हा पिण्डगत गुण होय; व तिरंदाजी हा स्वतः अभ्यासाने मिळविलेला म्हणजे संस्कारप्राप्त गुण होय. असा भेद सांगून शास्त्रज्ञ म्हणतात की 'क' हा आपल्या पुत्राच्या ठायी पिण्डगत गुणच तेवढा संक्रांत करू शकतो. संस्कारप्राप्त गुणाचा त्याच्या पुत्राला लवलेशही मिळणार नाही. अभ्यासाने 'क' चा पुत्र तिरंदाजी कदाचित् साध्य करील. पण गायकाच्या बाबतीत जसे त्याला आधीचे भांडवल मिळेल, तसे तिरंदाजीच्या बाबतीत मिळणार नाही. याचा अर्थ असा की आज समाजांत खालच्या थरात असलेली जात कितीही पिढ्या उच्च शिक्षण घेत राहिली तरी सुधारणे, विशेष सुधारणे, शक्य नाही. कारण एका पिढीवर आपण कितीही संस्कार केले तरी ते पुढील पिढीवर रक्तातून संक्रांत होत नसल्यामुळे पुढल्या पिढीला पुन्हा श्रीगणेशापासूनच सुरुवात करावयास हवी.
 लामार्क नावाचा पंडित संस्कारप्राप्त गुण संक्रांत होतात असे मानीत असे. डार्विनही तसे थोडेसे मानी. पण बेझमानपासून ही परंपरा बदलली व