पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(११)

जन्मला, यावर अवलंबून असते, असे मत गाल्टनने आपल्या 'हेरिडिटरी- जीनियस' या पुस्तकात प्रतिपादिले आहे. इतके करूनच तो थांबला नाही; तर ज्या अर्थी थोर कुलांतच थोर व्यक्ती निर्माण होतात असे दिसते, त्या अर्थी त्या थोर कुलांचा हलक्या कुलांशी लग्नसंबंध होणे हे घातुक आहे असे सांगून शंभर वर्षांपूर्वीच निघालेल्या समतेच्या तत्त्वावर त्याने कुऱ्हाड घातली व समाजाच्या प्रत्येक वर्गातील थोर कुले निवडून काढून त्यांचे आपआपसांत विवाह घडवून आणावे व समाजाने त्यांच्या भरणपोषणाची काळजी इतरांपेक्षा जास्त घ्यावी, असे विचार तो पसरवू लागला. प्रथम त्याच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. पण १८९० च्या सुमारास त्याला अनुयायी मिळू लागले; व आनुवंशाचा- पित्याचे गुण पुत्राठायी संक्रांत होतात- या सिद्धान्ताचा सर्वत्र अभ्यास सुरू झाला. याच सुमारास जननशास्त्र, वनपस्पतिशास्त्र संकर, या विषयांतले शोधही पंडितांच्या हाती आले व त्यावरून रक्ताला, आनुवंशाला सर्वस्वी नाही तरी फार मोठी किंमत आहे व हे लक्षात घेऊनच समाजरचना झाली पाहिजे, असे त्यांचे मत बनत चालले व समता, बंधुता, स्वातंत्र्य वगैरे शंभर वर्षे उराशी बाळगलेली तत्त्वे ढासळू लागून सुप्रसिद्ध 'सुप्रजाजनन- शास्त्राचा' उदय झाला.
 आनुवंशाचा हा शोध आमच्याकडे मनु नावाच्या महापंडिताने फार पूर्वीच लावला होता. घराण्याच्या व रक्ताच्या शुद्धतेला फार मोठी किंमत आहे, हे त्याने ओळखले होते. ही आम्हाला फार अभिमानाची गोष्ट आहे पण त्याबरोबर दुःखाची गोष्ट अशी की गाल्टनमागून त्याचा प्रत्येक सिद्धांत तावूनसुलाखून घेऊन त्यांतल्या चुका, अतिशयोक्त्या टाकून देऊन शुद्ध शास्त्र सांगणारे अनेक पंडित त्यांच्याकडे होत आहेत. तशी परंपरा आमच्याकडे मुळीच झाली नाही. तर उलट आजही मनुवचन हे अक्षरशः शास्त्रशुद्ध व अनुकरणीय आहे, असे एकांतिक विधान करणारे रा. गो. म. जोशासारखे लेखक आमच्या समाजात निघतात.
 थोर घराण्यांतच थोर व्यक्ती निर्माण होतात, इतर घराण्यांत होत नाहीत, हा सिद्धांत अत्यंत निराशजनक आहे. तो खरा असल्यास तेथे कोणाचाच इलाज नाही. पण तो तसा नाही व समाजरचनेत त्याचा हिंदूंनी केलेला उपयोग फारच घातुक आहे असे दाखविणे शक्य वाटत असल्यामुळे या लेखांत