पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(८)

कोणापुढे मान न वाकविता स्वातंत्र्याने राहणे ही मोठ्या संस्कृतीची मुख्य लक्षणे आहेत. आणि या दृष्टीने पाहिले आणि संबंध हिंदुस्थानचा विचार केला तर, गेल्या पाचसातशे वर्षात आपली स्थिती फार खालावली आहे असे कोणाही समंजस माणसाला मान्य करावे लागेल. महाराष्ट्राचाच फक्त इतिहास थोडासा उज्ज्वल आहे. पण तो चातुर्वण्याचे सर्वं नियम झुगारून 'प्रत्येकाला वाटेल ती संधी' या तत्त्वान्वये चालल्यामुळेच उज्ज्वल झाला आहे, हे या प्रबंधात एकदोन ठिकाणी दाखविलेच आहे.
 यावरून असे दिसेल की केवळ जगणे यात काही पराक्रम नाही. जगातले सर्व लोक तसे जगून आहेतच. संस्कृतीसह मानाने जगणे असा अलीकडच्या जगण्याचा अर्थ असेल तर ते हिंदूंना साधलेले नाही. जेव्हा साधले होते तेव्हा चातुर्वर्ण्य नव्हते. मध्यंतरी थोडेसे पुन्हा साधले तेव्हा चातुर्वर्ण्य मोडल्यामुळेच ते साधले. अर्धवट संस्कृतीने कसेबसे टिकून रहाणे असा जरी जगणे या शब्दाचा अर्थ केला तरीही चातुर्वर्ण्याचे समर्थन करता येणार नाही. कारण चिनी व ज्यू हे चातुर्वर्ण्यरहित समाज तसे टिकलेले आहेतच.
 यावरून निष्कर्ष असा निघतो की मन्वादि स्मृतिकारांनी हिंदूंना सांगितलेले समाजशास्त्र हे मुळीच यशस्वी ठरलेले नसून ते आमूलाग्र बदलावयास पाहिजे. ते बदलून कोणच्या नव्या तत्त्वावर समाजरचना करावयास पाहिजे याचे विज्ञानाने जे उत्तर दिले आहे ते मराठीत सांगण्याचा प्रयत्न मी पुढील प्रबंधात केला आहे.
 आनुवंश, रक्तसंकर, वृत्तिसंकर, लोकसंख्येचे नियमन, समाजाचे अंतिम ध्येय, राष्ट्रकल्पना, भौतिकशास्त्रे व धर्म, विवाहसंस्था, गृहसंस्था पश्चिमेच्या उत्कर्षाचे रहस्य इत्यादि अनेक प्रश्न येथे विचारासाठी घेतले आहेत. आणि अनेक युरोपीय व अमेरिकन शास्त्रज्ञांनी या बाबतीत जो अभ्यास केला आहे त्याच्या आधारे त्याचे विवेचन केले आहे. त्यांनी दिलेले अनेक निर्णय आपल्या समाजाला कसे लागू पडतात, याची चर्चाही केली आहे. त्यांच्या पुष्टीकरणार्थ आपल्या समाजाच्या इतिहासातील उदाहरणे दिली आहेत. तेवढ्यावरून वाचकांना समाजशास्त्राच्या मूलभूत तत्वांची बरीच कल्पना येईल असे वाटते.