पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७)

व्यवस्थेच्या अभावी टिकून होतेच! आणि त्यावेळेसही शक, यवन, पणी इत्यादि परकीयांच्या स्वाऱ्या या देशावर होतच होत्या. तेव्हा जातिव्यवस्थेनंतर जसे हिंदू टिकले, तसेच ते आधीपण टिकून राहिले होते. म्हणजे हिंदू टिकले असे म्हणावयाचे असेल, तर ते आज सहासात हजार वर्षे टिकले आहेत. पण मनूचे गोडवे गाण्याच्या भरात थापा देण्यास सोकावलेले लोक हिंदु दोनतीन हजार वर्षे टिकले आहेत, असे म्हणतात. कारण वर्णव्यवस्था नसताना हिंदू आधी टिकले होते. हे सांगणे त्यांना गैरसोयीचे असते.
 दुसरे असे की इतक्या पुरातन काळापासून टिकले आहेत, असे फक्त हिंदूच आहेत असे नाही. चिनी व जपानी लोक असेच टिकून राहिले आहेत. चिन्यांचा इतिहास तर इसवीसनापूर्वी चारहजारपर्यंत मागे पोचविता येतो. ज्यू लोकांची तीच स्थिती आहे. गेल्या दोन हजार वर्षात ज्यू लोकांचा जेवढा छळ झाला, तेवढा दुसरा कोणाचाच झाला नसेल. तरी ते टिकून आहेतच. पण या चिनी व ज्यू लोकांत वर्णव्यवस्था मुळीच नाही, तेव्हा टिकण्याचा आणि वर्णव्यवस्थेचा संबंध जोडणे केवळ हास्यापद होय. आणि केवळ टिकून राहाणे यातच पराक्रम असेल तर आफ्रिकेतल्या अनेक रानटी जाती टिकून राहिल्या नाहीत काय? आणि इतकेच काय- जगातले सर्व लोक टिकून राहिले नाहीत काय? हिंदू हिंदूस्थानात आले तेव्हा ही सध्याच्या हिंद्वेतर लोकांचे पूर्वज कोठे तरी कोणच्या तरी नामरूपाने होतेच. हिंदूंची कारकीर्द सुरू झाल्यानंतर ते माकडाच्या योनीतून मनुष्ययोनीत आले असे म्हणता यावयाचे नाहीत. त्याच्या आधीच कित्येक सहस्रके हिंदूंप्रमाणेच ते मनुष्ययोनीत आलेलं होतेच. आणि ते आतापर्यंत टिकूनही राहिले आहेत.
 येथे काही लोक असे म्हणतील की, हिंदूचे जगणे व इतरांचे जगणे यांत फरक आहे. कारण हिंदूंनी फार मोठी संस्कृति निर्माण केली आहे. हे उत्तर जर खरे असेल तर याचा अर्थ स्पष्टपणे असाहोतो की केवळ जगण्याला महत्त्व नसून संस्कृतीला महत्त्व आहे. माझ्या मताने रामायण, महाभारत, यांसारखी महाकाव्य रचणे; सांख्य, योग्य वेदान्त यासारखी दर्शने लिहून, जगाच्या आदिकारणांचा ठाव पाहणे; गणित, रसायन, वैद्यक, ज्योतिष यांसारखी शास्त्रे हस्तगत करणे, अर्जुन, समुद्रगुप्त यांनी केले तसे दिग्विजय करणे; नृत्य नाटय, गायन, शिल्प इत्यादि कलांची जोपासना करणे; आणि