पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६)

 यांपैकी प्रत्येक विधानाची स्वतंत्रपणे चर्चा करून ते कसे असिद्ध आहे, ते दाखविलेच आहे. येथे पुन्हा एकदा सांगावेसे वाटते की भिन्न रक्त म्हणज काय, व येथे असलेल्या प्रत्येक जातीचा विशिष्ट गुण कोणता हे स्पष्टपणे त्या पंथाच्या लोकांनी दाखविल्यावाचून त्यांच्या मताला म्हणजेच हिंदूंच्या जातिव्यवस्थेला काडीचाही अर्थ नाही. माझा लेख प्रसिद्ध झाल्यावर या विषयावर दोनतीन ठिकाणी वादविवाद झाला. पण या प्रश्नाचे उत्तर देण्याचे दर ठिकाणी टाळले गेले. तेव्हा वाचकांनी एवढे नेमके ध्यानात ठेविले पाहिजे की पंधराशे जातींचे पंधराशे विशिष्ट गुण स्पष्टपणे दाखविल्यावाचून जातिव्यवस्थेला काहीही अर्थ नाही. वृत्तिसंकर व बालविवाह यांचा विचार पुढे केलाच आहे. पण हिंदू जगले म्हणजे काय? या प्रश्नाची थोडी चर्चा करणे अवश्य आहे. 'रक्त भिन्न म्हणजे काय,' या विचारात जसा घोटाळा आहे, 'तसाच जगणे म्हणजे काय' या विचारातही घोटाळा आहे. आणि या दोन बाबतीत हेतुपुरस्सर घोटाळा करूनच त्यावर सनातनपंथाची अर्वाचीन उभारणी करण्यात आली आहे.
 जगणे याचे दोन अर्थ होतात. एक स्वाभिमानाने पूर्वजांचा लौकिक कायम ठेवून जगणे असा अर्थ होईल; आणि दुसरा फक्त टिकून राहाणे, न मरणे, पूर्वीचे सत्त्व नाहीसे झाले असूनही केवळ शरीराने जगणे असा अर्थ होईल. आणि याच अर्थाचा घोटाळा सनातनी लोक करीत असतात. आपण या दोन्ही गोष्टींचा विलगपणे विचार करू.
 हिंदू आपल्या पूर्ण वैभवानिशी आतापर्यंत टिकून आहेत, असे स्पष्टपणे जुन्या पक्षालाही- काही वेडगळ लोक सोडून दिल्यास- म्हणता येणार नाही. वैभव नसताना नुसते टिकून रहाणे, हीही काही कमी महत्त्वाची गोष्ट नाही. अजिबात मरण्यापेक्षा ती चांगलीच आहे. आणि भोवतालच्या मिसरी, बाबीलोनी इत्यादि संस्कृती नष्ट झाल्या तरी हिंदू टिकून राहिले, नुसते जीव धरून का होईना पण टिकून राहिले, यात काही तरी विशेष आहे, हे मान्य केलेच पाहिजे. पण याचा संबंध लोक जातिभेद आणि वर्णाश्रमव्यवस्था यांशी जो जोडतात, तो मात्र मान्य होणे शक्य नाही. वर्णाची व जातींची कडक व्यवस्था आज तीन हजार वर्षेच आहे. त्याच्या आधी वेदाच्या संकलनापासून जरी काळ मोजला, तरी तीन हजार वर्षे हिंदू लोक जाति-