पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५)

तसे वाटते. अलिकडे विज्ञानाचा पगडा जरा जास्त होऊ लागला आहे. यावरून निरनिराळ्या काळी निरनिराळ्या शक्ती माणसाला हलवीत असतात हे उघड दिसून येईल. या सर्वांचा विचार करून समाजशास्त्रज्ञाने मानवाला त्याच्या कल्याणाचा मार्ग दाखवायचा असतो. म्हणूनच हे कार्य फार जबाबदारीचे आहे.
 गेल्या शंभर दीडशे वर्षांत या क्षेत्रात युरोपमध्ये फार मोठे कार्य झाले आहे. ऑगस्टस् कोंट या फ्रेंच पंडिताने १८३८ साली प्रथम (सोशिऑलजी) समाजशास्त्र हा शब्द वापरला. हर्बट स्पेन्सरने तो पूर्ण रूढ केला. लेस्टर बार्ड हा अमेरिकन पंडित आहे. न्यूटन, फ्राईड यांची आपापल्या क्षेत्रात योग्यता आहे तितकीच समाजशास्त्रात यांची आहे असे काहींचे मत आहे. समाजशास्त्राची अंगोपांगे पाहिली तर आज हजारो नाणावलेले शास्त्रज्ञ या क्षेत्रात काम करीत आहेत असे दिसून येईल.
 इकडील कांही पंडितांच्या मते हिंदूंनी मागे जो समाजशास्त्राचा अभ्यास केला आहे व अनेक स्मृतीमधून व विशेषतः मनुस्मृतीत जो प्रगट झाला आहे तो अगदी पूर्ण असून जशाचा तसा आजच्या समाजाचे प्रश्न सोडविण्यास पुरेसा आहे. हे मत कसे भ्रामक आहे, हे पुढील शेदीडशे पानांच्या प्रबंधात, ठायी ठायी दाखविलेच आहे. पण त्या संबंधात एक स्पष्टपणे खुलासा करणे अवश्य वाटते, तो येथे करीत आहे.
 (१) येथे असलेल्या निरनिराळ्या जाती तितक्या भिन्न गुणांसाठी टिकवून धरणे अवश्य आहे म्हणून त्यांनी आपआपसात लग्ने करू नयेत; (२) जितका पैसा (म्हणजे अन्न) असेल तितकीच माणसे निर्माण व्हावी व वरच्या गटांतील संख्या वाढून खालच्या गटांची संख्या कमी व्हावी, हे श्रेयस्कर असल्यामुळे या जातींनी एकमेकांचे धंदे करू नयेत, आणि (३) निसर्गाच्या निवडीला योग्य वाव मिळण्यासाठी शक्य तितकी जास्त प्रजा व्हावी या दृष्टीने व इतरही अनेक दृष्टीने समाजात बालविवाह व्हावेत हे हिंदूच्या सर्व समाजशास्त्राचे तात्पर्य आहे.
 आणि या नियमाअन्वये वागल्याने आज भोवतालच्या अनेक संस्कृती... नाश पावल्या असताना हिंदू टिकून राहिले आहेत असे या लोकांचे म्हणणे आहे.