पान:विचार सौंदर्य.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाङ्मयाची प्रवृत्ति व त्याचीं ध्येयें

९७

त्याहून कमी दर्जाचें ध्येय होय. केवळ पुस्तकांचीच कढी व पुस्तकांचाच भात या योगेंकरून वाङ्मयात्मक जीवनाचें खरें पोषण होणार नाहीं; त्याला सात्त्विकता, तेजस्विता, धैर्यशीलता इत्यादि गुण आवश्यक आहेत.

 तात्पर्य, सरस्वतीची भक्ति करूं पहाणाऱ्यानें स्वतःस केवळ सारस्वतांत गुरफटून घेऊं नये. प्रत्यक्ष सरस्वतीमातेला आपले भक्त रांगत्या अर्भका- प्रमाणें आपल्या भोंवतीं घिरट्या घालीत आहेत हैं पाहून बरें वाटेल कीं काय ह्याबद्दल मला शंका वाटते. माझ्या भक्तांनीं जन्मभर माझ्या भोंवतालींच न फिरतां बाह्य विश्वांत जाऊन तेथील हरतऱ्हेची शोभा पहावी, आपल्या सवंगड्यांबरोबर हरतऱ्हेचा आनंदोपभोग व्यावा, हरतऱ्हेचा पराक्रम करावा, तेज दाखवावें, सत्य-सौजन्य-सौंदर्यादिक ध्येयानुसार नवनिर्मिति करावी, किंबहुना विश्वामित्राप्रमाणें अपर-सृष्टीच निर्माण करावी, साहस करून श्री मिळवावी,व मग कलाविलासाकरतां, काव्यशास्त्रविनोदाकरतां, सुखदुःखाच्या गोष्टी बोलण्याकरतां, माझ्याभोंवतीं सर्वांनी जमावें असें ती म्हणेल. मातेला काय, किंवा पत्नीला काय, बाह्य विश्वांत पराक्रम करणारा पुत्र किंवा पति प्रिय असतो. या न्यायानें पाहतां आपण वाङ्मयभक्तांनीं वारुळांतल्या मुंग्यांप्रमाणे शब्दक्षेत्रांतच डोकें खुपसून शाब्दिक वारूळ निर्माण करण्यापेक्षां सत्यान्वेषणाच्या, सौजन्यपोषणाच्या व सौंदर्योपासनेच्या बाबतींत पौरुष, तेज, स्वतंत्रता, नवनिर्मितिकुशलता इत्यादि गुण दाखविले तर आपण सरस्वतीमातेला प्रिय होऊं, व विविध प्रकारची सात्त्विक श्री ही 'साहसे श्रीः प्रतिवसति' या न्यायानें आपणांस वरील. आपण वाङ्मय- भक्तांनीं आतां शब्दक्रीडा किंवा शब्दशौर्य हैं आपलें ध्येयच नाहीं हैं स्पष्टपणें, निर्भीडपणें व निर्भयपणें ओळखले पाहिजे. वाङ्मयसेवक म्हणजे पुष्कळांना असे वाटतें कीं, तो शब्दांशीं खेळणारा किंवा शब्दांचा कीस काढणारा गरीब बिचारा प्राणी आहे. ही लोकांची कल्पना दूर केली पाहिजे. 'शब्दपांडित्य' हैं आपलें ध्येय राहिले नाहीं हें जगाच्या निदर्शनास आणून दिलें पाहिजे. आपण शब्द वापरावेत पण त्या शब्दां- पाठीमागें आचारविचारांचें तेज व पावित्र्य पाहिजे. वाङ्मयसेवक हे गरीब बिचारे, भोळेभाबडे, व्यवहार न समजणारे, समाजाशी संबंध न ठेवणारे, व श्रीमंतांच्या आश्रयावर कसे तरी पोसले जाणारे, निरुपद्रवी व निरुपयोगी

 वि. सौं....७