पान:विचार सौंदर्य.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विचार सौंदर्य

लोक आहेत अशी कांहीं लोकांची जी कल्पना झालेली आहे ती दूर केली पाहिजे. त्यांना आपल्याबद्दल आदर वाटूं लागला पाहिजे. दुर्जन असतील त्यांना आपली भीति वाटली पाहिजे !

 असत्य, दुर्जनता व हरतऱ्हेची कुरूपता यांचा विनाश करणें व सत्य, सौजन्य आणि सौंदर्य यांचें संस्थापन करणें हें आपलें अवतार-कृत्य आहे. अर्थात् कंसादिकांना ज्याप्रमाणें कृष्णाची भीति वाटत होती त्याप्रमाणेंच दुर्जना- दिकांना आपली भीति वाटली पाहिजे. दौर्जन्य कोठेंहि व कोणत्याहि क्षेत्रांत असो, तें आपणांस असह्य झाले पाहिजे. अन्याय हा सरकारचा असो किंवा संस्थानादिपतींचा असो, हिंदूंचा असो किंवा मुसलमानांचा असो, ब्राह्मणांचा असो किंवा ब्राह्मणेतरांचा असो, तो नाहींसा करण्याकडे वाङ्मयाची प्रवृत्ति झाली पाहिजे. हें काम निर्भयपणे झाले पाहिजे. परतंत्रता कोठल्याहि क्षेत्रांतली असो, ती सामाजिक असो, धार्मिक असो, वाङ्मयात्मक असो, आपणांस ती अवंद्य असली पाहिजे व सर्वांना ती अवंद्य होईल अशी आपली वाङ्मयप्रवृत्ति पाहिजे. दास्य राजाचें असो, संस्थानिकाचें असो, रूढीचें असो, किंवा पुरातन शास्त्राचें असो, त्याचें निर्मूलन करण्यास आपण प्रवृत्त झाले पाहिजे. थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे सत्य, सौजन्य आणि सौंदर्य या त्रिमूर्तीचेंच ध्यान, भजन व पूजन आपण केले पाहिजे व कृत्रिम रूढि, परंपरा, संकेत, इत्यादिकांचें दास्य, वर्चस्व किंवा बंधकत्व पार झुगारून दिलें पाहिजे व झुगारून देण्यास लोकांना शिकविलें पाहिजे. हें व्रत आपण स्वीकारले व आपली वाङ्मयात्मक तपश्चर्या या ध्येयाला अनुसरून झाली तर तुष्टि, पुष्टि व शांति यांचा लाभ आपणांस व जगास मिळून दैवी संपत्तीचें जगांत साम्राज्य होईल व उच्चतम कलाविलासांत रममाण होऊन अलौकिक अशा सात्त्विक आनंदाचे आपण वांटेकरी होऊं.

                                              ★ ★ ★