पान:विचार सौंदर्य.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९६ 

विचार सौंदर्य

थोडेसे विकृत व अतिशयोक्त हावभाव करावे लागतील ! असे हावभाव शक्य व्हावेत म्हणून नाटककाराला तदनुकूल भाषणें पात्रांच्या तोंडीं घालावी लागतात, व अशा रीतीनें नाटक-वाङ्मय दूषित होतें. स्त्रिया नाटकांत काम करूं लागल्या तर नाटककाराला लोकांच्या मनावर परिणाम करण्याकरितां विकृत, अस्वाभाविक व असंस्कृत भाषणे घालण्याचा मोह जरा कमी होईल, व नाटक-वाङ्मय सुधारेल अशी मला खात्री वाटते. आतां नीतिदृष्ट्या नट-नटींवर काय परिणाम होईल तसेंच एकंदर समाजावर याचा काय परिणाम होईल, हा प्रश्न निराळा. यासंबंधींहि माझी मतें अलीकडे निश्चित झालीं आहेत व तीं स्त्रियांनीं रंगभूमीवर काम करावें याला अनुकूल अर्शी आहेत; पण या मतांचा वाङ्मयाशी संबंध फारसा नसल्यामुळे त्यांचा ऊहापोह येथें करीत नाहीं.

               X           X             X

वाङ्मय हें केवळ छायात्मक नाहीं. ते जिवंत, नवनिर्मितिशील व सामर्थ्यवान आहे आणि उच्चतम जीवनाचें तें एक अंग आहे हे सर्व मला मान्य आहे; वाङ्मयाचें महत्त्व मी कमी करूं इच्छित नाहीं. वाङ्मय हें जीविताचें आवश्यक अंग आहे; त्याच्या योगानें जीविताला पोषण मिळतें, योग्य मार्ग दिसतो, इष्ट वळण लागतें, सामर्थ्य वाढतें व शोभा आणि तेज यांचा लाभ होतो, हें सर्व मला कबूल आहे. पण हें सर्व केव्हां, तर वाङ्मय आपलें खरें अवतारकृत्य विसरणार नाहीं तेव्हां. सत्य, सौजन्य व सौंदर्य यांची उपासना हें जीविताचें ध्येय आहे, पण यांकडे दुर्लक्ष करून केवळ दुसऱ्यांच्या पुस्तकांचें किंवा शब्दांचें चर्वितचर्वण किंवा पृथक्करण किंवा संशोधन करणारें परोपजीवि पोपट-पंची वाङ्मय विशेष महत्त्वाचें नाहीं. सृष्टि हा एक काव्यग्रंथ आहे असें कल्पिलें तर हा काव्यग्रंथ निर्माण करणारा कवि आपणांस ध्येयभूत असावा. भीष्माच्यासारखें सच्छील व पराक्रमी जीवन असल्यावर मग शांतिपर्वात वगैरे जे तत्त्वज्ञान सांगितलें आहे तसे तत्त्वज्ञान वाङ्मयाला भूषणावह होतें. रामाचें किंवा सीतेचें चरित्र काव्यमय होतें तसे आपलें चरित्र व्हावें अशी इच्छा धरावी; वाल्मीकीप्रमाणें रामायण लिहिण्याची आकांक्षा धरणें हें त्याहून कमी दर्जाचें ध्येय होय; व अशा ग्रंथावर टीका, भाष्ये वगैरे लिहिणें हें तर