पान:विचार सौंदर्य.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाङ्मयाची प्रवृत्ति व त्याची ध्येयें

९५

उटजांत स्वस्थ पडून राहिली असेल किंवा हरिणाशीं खेळत असेल किंवा मृत्तिकाकलश घेऊन गोदावरीवर पाणी आणण्याकरितां जात असेल किंवा गेली असेल; परंतु हा देखावा पाहून राम हा ( सीतेच्या शृंगारिक चेष्टा, भाषण हावभाव वगैरेंच्या पूर्ण अभाव देखील,) कामवश झाला असेल. खरी सीता रडत नसतां, किंबहुना ती बाहेर आनंद दाखवीत असतां देखील, खरा राम मी आनंदित आहें असें दाखविण्याचा तिचा कृत्रिम प्रयत्न पाहून दुःखित झाला असेल ! रसिक प्रेक्षकांचेंहि असेंच आहे. नाटकांतील पात्रांच्या तोंडीं अलीकडच्या कांहीं नाटककारांनीं जीं भाषणे घातलेली असतात व कांहीं नट-नटी जे अभिनय करीत त्यांत असे गृहीत धरलेले दिसतें कीं, नाट्यविश्वांतील पात्रें व नट-नटी हीं त्या त्या कामादि विकारांनीं विद्ध आहेत !

 पुष्कळ लोक कामुक व कामजनक यांमध्ये फरक करीत नाहींत पण एखाद्या पुरुषाची किंवा स्त्रीची कामुकता ही कामजनक न होतां क्रोधजनक, किंवा हास्यजनक होते हैं ते विसरतात, त्याचप्रमाणे क्रोधात्मक व क्रोधजनक, यांमध्ये फरक केला पाहिजे. एखाद्याचा क्रोध क्रोध उत्पन्न करीत नाहीं, तर तो हास्याला किंवा शोकाला कारणीभूत होतो. याच न्यायानें शोकात्मक भाषणे किंवा हावभाव एखादे वेळेस क्रोध उत्पन्न करतील किंवा हास्याला कारणीभूत होतील. खऱ्या संसारांतले हे प्रकार ध्यानांत धरले म्हणजे नाट्यसृष्टीत देखील श्रृंगारिक भाषणें शृंगार रसाच्या उत्पत्तीला कधीं कधीं कशीं प्रतिकूल असतात हे ध्यानांत येईल.

 नाटकें सदोष आहेत याला जनतेचें अज्ञान व ही असदभिरुचि, याप्रमाणेंच आणखी एक कारण आहे. तें असें कीं, आपल्या स्त्रियांच्या भूमिका स्त्रियांनी घ्यावयाच्या ही संस्कृतवाङ्मयकालीन चाल बंद पडून हल्लींच्या रंगभूमीवर स्त्रियांच्या भूमिका पुरुष घेत असतात. उत्तम नट असला तरी 'नटी'चें काम करण्याच्या दृष्टीनें पुरुषांमध्यें स्थूलत्वादि जे शरीरदोष आहेत त्यांमुळे सूक्ष्म, कोमल व सुसंस्कृत रीतीनें रसोत्पत्ति करणें त्यांना अशक्यप्राय होऊन जातें. एखादी उत्तम नटी नुसत्या आपल्या नजरेनें, लाजण्यानें, किंवा हंसण्यानें शृंगाराची ती ती छटा उत्पन्न करूं शकेल, पण ही छटा उत्पन्न करण्याकरितां बालगंधर्वांसारख्यांना देखील