पान:विचार सौंदर्य.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाङ्मयाचीं प्रवृत्ति व त्याचीं ध्येयें

९३

सामर्थ्यात वगैरे कमी नाहीं अशी जाणीव कित्येक वेळां उत्पन्न होईल व या स्व-माहात्म्य-प्रतीतीमुळे आनंद होईल ही गोष्ट कबूल; परंतु नेहमींच या कल्पना येत नाहींत व दुसरें असें कीं, उदात्त वस्तु पाहतांना भासमान भयानकतेत असलेलें रम्यत्व, भासमान नियमराहित्यांत असलेली नियमबद्धता, भासमान अव्यवस्थेत असलेली व्यवस्था असल्या वस्तु उत्पन्न करणाऱ्या शक्तीचें सामर्थ्य, तिची कल्पकता, इत्यादि गोष्टी देखील प्रतीत होऊन भासमान अशिव हें शिवस्वरूपी आहे असे वाटू लागतें आणि अशा प्रकारच्या प्रतीतीमुळेंहि पुष्कळ वेळां आनंद होतो. कॅन्टनें आपल्या आत्म्याच्या नैतिक महत्त्वाच्या जाणिवेला फाजील महत्त्व दिले आहे. रम्यत्व (“the beautiful”) पाहून कां आनंद होतो याची उपपत्ति लावतांना कॅन्ट आत्मा व परमात्मा किंवा जीव व शिव यांचें समरसत्व होणे शक्य आहे अशी जाणीव रम्य वस्तु पाहतांना होते म्हणून आपणांस आनंद होतो अशा प्रकारच्या गूढवादांत जसा शिरतो त्याप्रमाणें उदात्तवस्तुविषयक आनंदाची उपपत्ति लावतांनाहि तो वरील प्रकाराच्या गूढवादांत शिरतो. पण गूढवादानें विवेकबुद्धीचें समाधान होणें शक्य नाहीं. 'विदर्भ-वीणा ' नांवाच्या सुंदर कविता-संग्रहाला विद्वद्वर्य श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनीं लिहिलेल्या विद्वत्तापूर्ण प्रस्तावनेंत उदात्तत्वापासून होणाऱ्या आनंदाची त्यांनीं निराळीच उपपत्ति लावलेली आहे. ते म्हणतातः-

 उदात्त वस्तूचे गुण दुःखप्रदता, विशालता, गुरुत्व, सामर्थ्य, अनंतत्व, संकटाकुलता, भव्यता, उच्चस्वरत्व, आकस्मितता, उज्ज्वलता इत्यादि असून सुंदर वस्तूचे गुण अनुरूपता, अल्पप्रमाणता, मृदुता, क्रमविकारिता, सौकुमार्य, सौम्यता, विभ्रम इत्यादि आहेत. पहिलीनें मनास विस्मय व दुसरीनें आनंद वाटतो. पहिलीनें मनावर दडपण पडून त्याची स्वतंत्रता नाहींशी होते. दुसरीनें त्यास मोकळेपणा वाटतो. हेच गुण स्थूलमानानें अनुक्रमें पुरुषाचे व स्त्रीचे असल्याकारणानें वरील आकर्षणाचा उगम स्त्री-पुरुषांच्या प्रकृतिभेदामुळे परस्परांबद्दल वाटणाऱ्या अपूर्वतेच्या भावनेंतच असला पाहिजे असें वाटूं लागतें; व सूक्ष्म विचारांतीं त्या मतास दृढता येते. प्रत्येक मनुष्याच्या स्वभावघटनेंत- मग तें मनुष्य स्त्री असो अगर पुरुष असो- स्त्रीत्व व पुरुषत्व यांचें कमीअधिक प्रमाणांत मिश्रण असतें. असामान्य