पान:विचार सौंदर्य.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९२ 

विचार सौंदर्य

किंवा बैठकीचें आहे, ग्रंथकाराच्याच मनाची बैठक बसली नसली, काव्य- नाटिकादि लिहीत असतां वृत्ति क्षुद्र दर्जाची असली, तर त्याच्या लेखानें उत्पन्न होणारी वृत्ति सदोष व हीन दर्जाची असण्याचा संभव आहे; व अर्थात् त्याच्या लिखाणापासून उच्चत्तम रसाची उत्पत्ति होणें कठीण आहे.

 त्याचप्रमाणे लेखक कितीहि चांगला असला तरी वाचकांचें मन जर तयार नसेल, त्यांचें चित्त जर अव्यवस्थित आणि ध्येयशून्य असेल, तर त्यांच्या हृदयांत उच्चत्तम रसोत्पत्ति होणें कठीण. आपल्या मराठी वाङ्मयांत जी वाण आहे ती मनाची विशिष्ट घडी बसलेल्या लेखकांची व वाचकांची आहे. संसारांतील हरतऱ्हेच्या बारीकसारीक चमत्कृतिजनक गोष्टी पाहून त्यांतील चमत्कृतींचें वर्णन आमचे कवि, कादंबरीकार वगैरे करूं शकतात, कारण या चमत्कृति सामान्य माणसाच्या ध्यानांत येत नसल्या तरी त्या ध्यानांत येण्यास विचाराचा खोलपणा, वृत्तींची गंभीरता, आकांक्षांचें उच्चत्व, इत्यादि गुणांची अपेक्षा नसते, रसोत्कर्षाला सुसंस्कृत वाचक आणि सुसंस्कृत लेखक यांची सांगड जुळावी लागते.

 जर्मन तत्त्ववेत्ता कॅन्ट यानें खोल दऱ्या, उंच पर्वत, महा-पूर, वगैरेंसारख्या 'उदात्त' (sublime) बस्तु पाहून का आनंद होतो याची अशी उपपत्ति सांगितली आहे कीं, उदात्त वस्तु आकारानें कितीहि मोठ्या असल्या, त्यांचें सामर्थ्य कितीहि असले, तरी त्यांचें आकलन करणारा आपला आत्मा त्यांहून मोठा आहे आणि नैतिक दृष्ट्या अधिक योग्यतेचा आणि सामर्थ्यवान् आहे अशी प्रतीति तेथें उत्पन्न होते आणि आपल्या मोठेपणाच्या या प्रतीतीमुळे आपणांस आनंद होतो. पण ही उपपत्ति सर्वत्र लागू पडत नाहीं आणि लागू पडते तेथें अपुरी पडते. महापूर किंवा वादळ पाहत असतां आपण सुरक्षित असतो म्हणून थोडासा आनंद होतो ही गोष्ट खरी आहे. ओव्हरकोट, बूट वगैरे घालून थंडींत किंवा पावसांत फिरावयास जाण्यांत जो आनंद होतो त्यांत बाह्य परिस्थिति कशी जरी असली तरी आपण तिला दाद देणारे नाहीं या सुखदायक कल्पनेचा जसा अंश असतो त्याप्रमाणेंच महापर्वत, महापूर वगैरे उदात्त वस्तु पाहत असतांना या धोर किंवा अतिप्रचंड गोष्टींपासून आपले रक्षण करून घेऊं शकणारे व त्यांचें आमूलाग्र जरी नव्हे तरी थोडें बहुत बौद्धिक आकलन करणारे आपणहि