पान:विचार सौंदर्य.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाङ्मयाची प्रवृत्ति व त्याची ध्येयें

९१

पतिपत्नीमधील प्रेमांत जें एक उच्चतम स्वारस्य भरले आहे त्याची प्रतीति तें वर्णन वाचतांना आपणांस होते. म्हणून आपणांस आनंद होतो. ऑथेलो नाटकांत डेस्डेमोनाचा खून पाहून आपणांस जो आनंद होतो त्याचें कारण ऑथेलोशीं किंवा शेक्सपिअरशीं आपलें समरसत्व होते म्हणून नव्हे तर त्या त्या परिस्थितींत तीं तीं सच्छील पात्रेंहि तशा तशा रीतीनेंच वागणार किंबहुना त्यांनीं तसें तसेंच वागावें, हें सत्य कितीहि कटु असले तरी तें कळते व पटतें म्हणून. ( उत्तम भाषाशैली, अपेक्षापूर्ति, ग्रंथकाराच्या कथानक-रचनेबद्दलचें कौतुक, इत्यादि कारणेंहि तेथें असतात, पण त्यांचा विचार येथें करण्याचे प्रयोजन नाहीं. ) शोकगंभीर नाटकांत जो आनंद होतो त्याचें एक प्रमुख कारण असे आहे कीं, तसले नाटक पाहून किंवा वाचून कटु सत्य कळतें व पटतें आणि सत्य कटु असले तरी तें कळलें व पटलें म्हणजे मनुष्याला एक प्रकारचा आनंद होतो. उदाहरणार्थ, जगांत नुसतें प्रेम किंवा नुसता उदात्त हेतु एवढ्यानेंच काम भागत नाहीं हें तत्त्व ऑथेलो नाटक पाहिल्यानें किंवा वाचल्यानें मनावर ठसतें व एक प्रकारचा मनाला आनंद होतो. आनंदाचीं अशींच पुष्कळ कारणे आहेत. उदाहरणार्थ, सद्गुणभक्ति ही पत्नीप्रेमाहून अधिक वाटून ऑथेलोनें अत्यंत प्रिय असलेली आपली पत्नी दूषित आहे हे कळल्याबरोबर ठार मारली यांत त्याच्या मनाचें उदात्तत्व दिसून येतें व हा उदात्त देखावा आपल्या मनांत एकप्रकारची वृत्ति उत्पन्न करतो. या वृत्तीमध्यें आनंददायिकत्व आहे. रघुवंशांतील दुसऱ्या सर्गात वर्णन केलेला तो पर्वत, ती नन्दिनी वसिष्ठधेनु, तिला खाऊं पहाणारा तो सिंह, त्या सिंहाला ." माझें मांस वाटले तर खा पण ह्या गाईला सोड " असें म्हणणारा दिलीप राजा, इत्यादि सर्व गोष्टी वाचून व डोळ्यांपुढे आणून आपणाला जो आनंद होतो तो प्रथमदर्शनीं भयानक व शोकजनक भासणाऱ्या ह्या देखाव्यांत देखील जें एकप्रकारचें उदात्तत्व व रम्यत्व आहे, राजाशी बोलणाऱ्या सिंहामध्यें जें एक चमत्कृतिजनकत्व आहे, राजाच्या भक्तीमध्यें जें एक उच्चत्व व पावित्र्य आहे, त्या सर्वांकडे आपण तटस्थ, निःस्वार्थ, व अलौकिक अशा मनोभूमिकेवर बसून (तादात्म्यपूर्वक नव्हे तर) प्रेक्षक ह्या नात्याने पाहू शकतों म्हणून.

 सारांश, महत्त्व जें आहे तें ग्रंथकाराच्या व वाचकाच्या मनाच्या वृत्तीचें