पान:विचार सौंदर्य.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९० 

विचार सौंदर्य


आपण क्षणभर तादात्म्य पावतों म्हटलें तर एक वेळ चालेल, पण ग्रंथकाराची वृत्ति आणि प्रेक्षकांची किंवा वाचकांची वृत्ति नेहमीं एकच असते असें नाहीं. पुष्कळ वेळां ती भिन्न असते. पुष्कळ प्रेक्षकांच्या किंवा वाचकांच्या मनांत एखादा प्रवेश पाहून जे विचार येतात, ते ग्रंथकाराच्या स्वप्नांत देखील नसतात. वृक्षासारखी एखादी साधी वस्तु पहिली म्हणजे या इंद्रियसंनिकर्षजन्य साध्या ज्ञानामध्येंहि (Perception मध्येंहि ) कल्पनाशक्तीनें पुष्कळ भर घातलेली असते असें मानसशास्त्रज्ञ सांगतात व तें खरेंहि आहे. मग भावनांवर (Emotions वर ) आणि स्थिर वृत्तीवर (Sentiments वर ) अवलंबून असलेल्या नाटकांतील किंवा काव्यांतील प्रवेशांत त्या त्या प्रेक्षकाच्या किंवा वाचकाच्या कल्पनाशक्तीनें व भावनांनीं वगैरे पुष्कळच भर घातली असेल हें साहजिकच आहे. काव्यानंद जो आहे तो काव्य वाचीत असतां अल्पांशानें जागृत झालेले स्थिरभाव (Sentiments) व छायारूपानें किंचित् उद्दीपित झालेल्या भावना या सर्वांवर विचारशक्तीचे व कल्पनाशक्तीचे संस्कार होऊन जी एक मनाची ठेवण किंवा बैठक उत्पन्न होते तिच्यावर अवलंबून असतो. या मनाच्या वृत्तींत तें कोणत्याहि एका पात्रांशी, अनेक पात्रांशी किंवा ग्रंथकाराशीं पूर्ण तन्मय होत नाहीं. त्यांचे विचार व विकार आकलन करण्यापुरतें एक प्रकारचें समरसत्व तेथें असतें, पण वाचकाच्या मनानें तद्भिन्नत्व व तटस्थत्व केव्हांहि पूर्णपणे नष्ट होत नाहीं. काव्यानंद होण्याला एक प्रकारचें अंशात्मक समरसत्व आवश्यक असेल; पण केळकरांना वाटतें त्याप्रमाणे आनंदाचें हेंच कारण नव्हे किंवा प्रधान कारणहि नव्हे. एकंदर देखावा पाहून त्यांत आपणाला जो चमत्कार दिसतो व तो पाहतांना आपली जी एक मनाची वृत्ति (attitude) बनते त्यांत आनंददायित्व आहे.

 नाटकांतील शोकात्मक देखावे पाहून किंवा काव्यांतील तसलीं वर्णनें वाचून करुणरसाचा आस्वाद आपणांस कसा मिळतो हा प्रश्न मागें जो आपण सोडून दिला होता त्याचे धागे पुन्हा हातीं घेण्यास आतां हरकत नाहीं. रघुवंशांतील अज-विलाप वाचतांना मृत इन्दुमतीशीं किंवा शोकाकुल अजाशी आपण तादात्म्य पावतों म्हणून आनंद होतो असें नव्हे, तर या प्रसंगांतील व्यक्तिनिष्ठ स्वार्थदृष्टीचे भाम आपण बाजूला सारतों व