पान:विचार सौंदर्य.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाङ्मयाची प्रवृत्ति व त्याची ध्येयें

८९

अतिशयोक्ति आणि श्लिष्ट शब्दयोजना यांच्या आधारें जो खालच्या दर्जाचा विनोद साधला आहे ( तो अनुकरणास सुलभ असल्यामुळे ) त्याचीच कास हे विनोदी लेखक धरतात व आपल्यास हास्यास्पद करून घेतात !

 असो. नाटकांत, काव्यांत किंवा कादंबऱ्यांत प्रेक्षकांचें किंवा वाचकांचें पात्राशीं तादात्म्य पावल्यामुळे आनंद होतो या कल्पनेपासून हे दोष अंशतः उत्पन्न झाले आहेत हें मला सांगावयाचें होतें. या 'तादात्म्य' उपपत्तीवर आक्षेप म्हणून असा एक प्रश्न विचारण्यासारखा आहे कीं, नाटकांतील वगैरे कलिपात्रार्शी, खल-पुरुषाशी किंवा-खलस्त्रियांशीं, (Villain शीं) आपण तादात्म्य पावतों कीं काय ? बरें पावत असलों तर या तादात्म्यामुळें आपणांमध्ये त्या त्या पात्रांच्या दोषांचा प्रवेश होण्याचा संभव आहे की काय?

 जेम्स या मानसशास्त्रज्ञानें नेहमीं कलिपात्राचें काम करणाऱ्या नटांमध्यें तें काम करतांना कलिपात्रांच्या भावनांचा किंचित् संचार होतो असें म्हटले आहे. कायमचाहि थोडासा वाईट परिणाम होतो असें इतरांचें म्हणणे आहे. मला हें मत पसंत नाहीं. माझ्या मतें नट किंवा प्रेक्षक कलिपात्रार्शी तादात्म्य पावत नाहीं तर त्याच्याकडे परकी या न्यायानें पाहात असतो. प्रियाराधन करणारा तरुण मनुष्य युवतीच्या संगतींत आनंद पावतो तो तिच्याशीं तादात्म्य पावल्यामुळे नव्हे तर तिच्या लीलादिकांनीं तिचें उपभोग्यत्व प्रतीत होतें म्हणून. हाच न्याय येथेंहि लागू आहे. कलिपात्राच्या स्वभावाचें आकलन होण्यापुरतें एक प्रकारचें तादात्म्य तेथें असतें पण प्रेक्षकाचें किंवा वाचकाचें तद्भिन्नत्व केव्हांहि नष्ट पावत नाहीं. रा. नरसिंह चिंतामण केळकरांनीं सविकल्प समाधीची जी उपपत्ति सांगितलेली आहे तिच्यांत एक प्रकारचें जें तादात्म्य स्वीकारलेले आहे त्या तादात्म्याची व्याप्ति पात्राच्या मनोविकाराचें आकलन करण्यापुरती मर्यादित क्षेत्रांतील आहे अशी त्यांत सुधारणा केली पाहिजे, व सविकल्पत्वावर अधिक भर दिला पाहिजे. ज्या देखाव्यांत एकाहून अधिक पात्रें असतात, उदाहरणार्थ गडकऱ्यांच्या 'एकच प्याल्यां' तील 'आर्य मदिरामंडळाच्या' प्रवेशांत, प्रेक्षक कोणत्याहि एका पात्राशीं तादात्म्य पावत नाहीं तर एकंदर देखाव्याकडे पाहून त्याचा उपभोग घेतो. या प्रवेशांतील पात्रांचा मूर्खपणा व पागलपणा मनश्चक्षूंपुढें आणून त्याचें वर्णन करणाऱ्या नाटककारांच्या स्मितयुक्त तटस्थ वृत्तीशी