पान:विचार सौंदर्य.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८८ 

विचार सौंदर्य


आईबापांना दुःख होत असतें ! याच न्यायानें नाटकांतली किंवा काव्य- कादंबऱ्यांतली पात्रे स्वतः जरी हंसलीं नाहींत किंवा त्यांनी कोट्या केल्या नाहींत तरी हास्यरस उत्पन्न होऊं शकेल; स्वतः तीं रडलीं नाहींत तरी श्रोत्यांना किंवा वाचकांना तीं रडवूं शकतील; स्वतः शृंगारिक भाषा न वापरतां किंवा चेष्टा न करतां ते शृंगाररस उत्पन्न करूं शकतील, पण अलीकडच्या आपल्या कांहीं नाटकांत हीन अडाणी पात्रें देखील चाणाक्ष- पणाच्या कोट्या करतात. नाटककारांना व कांही प्रेक्षकांना वाटतें कीं, येथें उच्च विनोद साधलेला आहे; येथें हास्यरस साधलेला आहे. पण रसिकांना त्या ग्रंथकाराची व असल्या प्रेक्षकांची कीव मात्र येते ! कांहीं नाटकांतील सच्छील म्हणून दाखविलेल्या नायिका सच्छील स्त्रिया कधींहि वापरणार नाहींत अशी भाषा वापरतात व त्यांची सोंगें घेणाऱ्या नटी असभ्य अभिनय करितात. त्यांना वाटतें की आपण गंगाररस उत्पन्न करितों आहोत, पण सहृदय वाचकाच्या हा देखावा शोकजनक होतो ! आपल्या कांहीं नाटकांत, कादंबऱ्यांत वगैरे जी हीनता दिसते त्याचे कारण नाटककाराची किंवा श्रोत्यांची असदभिरुचि हैं एक असेल; पण रसोत्पत्तीविषयींच्या त्यांच्या कल्पना चुकीच्या असतात हेंहि एक तेथें कारण असावें. कांहीं नाटककारांना आणि नटांना हे समजत नाहीं की, उत्तम ध्वनिकाव्यांत शब्दांचा वाच्यार्थ जरी साधा असला तरी त्यापासून उत्तम ध्वन्यर्थ जसा निघूं शकतो त्याप्रमाणेंच विशिष्ट परिस्थितींतल्या नायक-नायिकांचीं साधी भाषणे किंवा साधे अभिनय देखील प्रेक्षकांच्या हृदयांत रसोत्पत्ति करूं शकतील. नाटकांतल्या किंवा कादंबऱ्यांतल्या किंवा काव्यांतल्या भाषणांत किंवा वर्णनांत वाच्यापेक्षां ध्वनीचें प्राधान्य असावें व त्यावरच ग्रंथकारांची भिस्त असावी हें तत्त्व आपले लेखक पुष्कळ वेळां विसरलेले दिसतात.

 उदाहरणार्थ, विनोदी लेखांतलीं पात्रें भलती अतिशयोक्ति करून किंवा वेळीं अवेळीं शक्य अशक्य शाब्दिक कोट्या करून वाचकांचें मन रिझवूं पाहतात. या विनोदाच्या बाबतीत दुर्दैवाची गोष्ट अशी झाली आहे कीं, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर व राम गणेश गडकरी ह्यांनीं बऱ्याच ठिकाणीं जो परिस्थितिनिष्ठ उच्चतम विनोद साधिलेला आहे तो त्यांच्या अनुयायांना साधत नाहीं व हे अनुयायी वरील गुरुद्वयांनी आपल्या लेखांत भलत्याच थराला नेलेली