पान:विचार सौंदर्य.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाङ्मयाची प्रवृत्ति व त्याचीं ध्येयें

८७

आनंद होतो तो बाहुलीशीं किंवा मुलीशीं आपण समरस होतो म्हणून नव्हे तर ती मुलगी बाहुलीला जेव्हां म्हणते कीं,

 शेजारीण वेणुचा बाहुला । नवरा तुजला आजि पाहिला,

 म्हणुनि लाजुनी धरिशीं अबोला ? ओळखलें बाई !

   नको तूं, सांगुं नको कांहीं ॥

तेव्हां बाहुली लाजते आहे अशी ज्या मुलीची कल्पना झालेली आहे अशा मुलीचें काल्पनिक चित्र आपल्या डोळ्यांपुढे येतें व आपणांस आनंद होतों, कोणाशीं तादात्म्य पावून नव्हे. बालकवि, तांबे, मायदेव, नागपूरचे सरंजामे वगैरेंच्या बालविषयक बऱ्याच कवितांविषयी असेंच म्हणतां येईल.

 विनोदात्मक, शोकरसात्मक, किंवा शृंगारात्मक इतर प्रसंग घेतले तर हा मुद्दा अधिक स्पष्ट होऊन विनोद, शृंगाररस, शोकरस, वगैरेंबद्दलच्या चुकीच्या कल्पनांनीं आपलें वाङ्मय कसें दूषित झालें आहे तें नजरेस येईल व हें वाङ्मय सुधारण्याची एक दिशा कळेल म्हणून या मुद्दयाचा थोडासा विस्तार करतों. नाटकांतील विनोदात्मक, शोकरसात्मक किंवा शृंगारात्मक प्रसंगीं पात्रानें स्वतः हंसले पाहिजे किंवा शृंगारचेष्टा केली पाहिजे किंवा रडले पाहिजे अशी कांहीं लोकांची कल्पना दिसते आणि म्हणून आपल्या वाङ्मयांतील कांही भाग हीन दर्जाचा झाला आहे. विनोद ज्या पात्रावर अवलंबून आहे तें पात्र स्वतः हंसणारे किंवा कोटि करणारें असले पाहिजे असें नाहीं; त्याचप्रमाणें शृंगाररस ज्यावर अवलंबून आहे त्या पात्रानें शृंगारिक चेष्टा किंवा भाषणे केलीं पाहिजेत असें नाहीं; करुणरस ज्यावर अवलंबून आहे त्यानें शोक केला पाहिजे असेंहि नाहीं. प्रेक्षकाच्या किंवा वाचकाच्या हृदयांत तो तो रस उत्पन्न होत असतो आणि ह्या रसोत्पत्तीकरितां पात्रानें हंसावे किंवा रडावें लागत नाहीं !

 नाटकांतल्या, काव्यांतल्या किंवा कादंबरीतल्या रसाचें अधिष्ठान पात्र नव्हे तर प्रेक्षकाचें किंवा वाचकाचें हृदय हे आहे हा मुद्दा ध्यानांत येण्याकरितां पुढील व्यावहारिक उदाहरणांचा विचार करावा. मुलगा जन्माला आल्या- बरोबर तो रडतो पण त्याचे आईबाप व त्याचे इष्टमित्र हंसतात ! भीष्मा- सारखा धीरोदात्त सत्पुरुष मृत्युसमयी रडत नाहीं, पण त्याचे भक्त शोकाकुल होतात ! दिवटा मुलगा आपल्या व्यसनांत रंगून गेलेला असतो, पण त्याच्या