पान:विचार सौंदर्य.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अलीकडे महाकाव्यें कां निर्माण होत नाहीत?


नाहीं. वाचकांना महाकाव्यें वाचण्यास फुरसत नाहीं म्हणणें तर हास्या- स्पदच आहे. मोठमोठ्या कादंबऱ्या व 'गीतारहस्या 'सारखे मोठमोठे ग्रंथ जर अलीकडे बाहेर पडूं शकतात व खपतात तर महाकाव्यांनींच असें काय केले आहे की, त्यांच्याबाबतींत मात्र हा न्याय लागू पडूं नये ? तसेंच कवीला किंवा कोणत्याहि लेखकाला फुरसत नाहीं हें म्हणणेदेखील बहुधा व बव्हंशीं खोटेंच असतें. त्याच्याजवळ विचार आहेत, कल्पना आहेत, उत्साह आहे, तो वेळांत वेळ काढतो व रात्रीचा दिवस करून व आपल्या विषयाशीं तद्रूप होऊन कलात्मक निर्मिति करूं शकतो. अपवाद कांहीं असतील, पण सामान्य नियम हा असा आहे. निर्मिति झाली तरी वाचक मिळाले पाहिजेत ना, असा कोण येथे प्रश्न विचारला तर त्याला उत्तर असें कीं, कलाकृति जी निर्माण होते ती बाजारांतल्या खाद्य-पेयादि जिनसांच्याप्रमाणे ' मागणी व पुरवठा' या अर्थशास्त्रीय न्यायाप्रमाणें होत नाहीं. काव्यनिर्मितीचें काय किंवा इतर कलाकृतीचें काय, अर्थ-शास्त्र निराळेंच आहे ! कलाविलासाचा आनंद इतरांना मिळावा व त्यांनीं आपली वाहवाहि करावी, असे हेतु जरी थोड्याबहुत प्रमाणांत कलानिरत मनुष्याच्या मनांत वावरत असले तरी कलाकृति निर्माण करतांना रसलोलुपांची संख्या तो मोजीत बसत नाहीं किंवा त्यांच्या ' वाहवा च्या टाळ्या मधून मधून ऐकूं आल्या नाहींत म्हणून अडून बसत नाहीं. महाकाव्याला अनुकूल असे रम्योदात्त, रम्यविशाल, रम्याद्भुत, रम्यभीषण इत्यादि प्रकारचे विषयच अलीकडील व्यावहारिक, शास्त्रीय, नीरस गद्यात्मक जगांत मिळत नाहींत ही रडहि अशीच निरर्थक आहे. आर्धी कोणताहि काळ गद्यात्मक असतो हैं म्हणणेंच खोटें आहे. काळ गद्यात्मक नसतो, तर मन गद्यात्मक असतें. पाहणाऱ्याला काव्य सगळीकडे आहे; काव्यदृष्ट्या जो अंधळा असेल त्याला सगळे जगच अंधळें व अंधारानें भरलेले दिसावयाचें. पूर्वी काव्याला विषय चांगले मिळत व हल्लीं मिळत नाहींत या म्हणण्यांत अर्थ काय ? पूर्वी युद्धे किंवा महायुद्धे होत होतीं आणि अलीकडे होत नाहींत असें नाहीं. पूर्वीच राष्ट्रांराष्ट्रांमध्ये किंवा संस्कृत-संस्कृतींमध्ये लढे होते आणि अलीकडे ते लढे नष्ट झाले आहेत असेंहि नाहीं. चंद्रकला, तारका, उषा वगैरे पूर्वी जशा होत्या तशाच हल्लीं आहेत. बायका पूर्वी सुंदर होत्या व अलीकडे