पान:विचार सौंदर्य.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विचार सौंदर्य

हा उत्तम कवि झाला असता व व्यास-वाल्मीकि इत्यादि पौरस्त्य कवि किंवा मिल्टन- शेक्सपिअर इत्यादि पाश्चात्य कवि यांनीं वयोवृद्ध व ज्ञानवृद्ध झाल्यावर जी कविता केली ती कविता त्याज्य ठरली असती; पण तज्ज्ञांना तशी ती वाटत नाहीं ! कांहीं ज्ञानी लोकांमध्यें कवित्व नसतें ही गोष्ट खरी आहे, पण कवित्वाभावाचें कारण त्यांचें 'ज्ञान' नव्हे, तर प्रतिभेचा अभाव हें होय. कांहीं असंस्कृत माणसांवर कवितादेवीचा वरदहस्त असतो हेंहि खरें, पण त्यांचें असंस्कृतत्व हें कांहीं कवितादेवीच्या कृपाप्रसादाचें कारण नव्हे, तर त्यांचें सहृदयत्व हे त्याचें खरें कारण होय. केवळ ज्ञान हें काव्य निर्माण करूं शकणार नाहीं; पण तें काव्यस्फूर्तीस विरोधहि करीत नाहीं; झालें तर उपकारक होतें. 'कवि' याचा अर्थ एके काळीं 'ज्ञानी ' असा होता. ( किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः इत्यादि वचनांची येथे कांहीं जणांना आठवण होईल. ) विद्वान् असून कवि असलेल्यांची कितीतरी उदाहरणें देतां येतील, व या उदाहरणांचा विचार केला असतां असें दिसून येईल कीं, विद्वत्व हें जसें सौजन्याच्या आड येत नाहीं, त्याप्रमाणेंच विद्वत्व हैं कवित्वाच्याहि आड येत नाहीं, कारण कवित्व हें निराळ्याच गोष्टींवर अवलंबून आहे.

 बाल्यांतील मुग्धत्वाचें रम्यत्व कवींनीं 'रम्य ते बालपण देई देवा' अशा रीतीनें गावें पाहिजे तर; त्याचप्रमाणे ' पाण्डित्यं निर्विद्य बाल्येन तिष्ठासेत् ' असें म्हणून वेदान्त्यांनीं बाल्याचें एका दृष्टीनें कौतुक करावें पाहिजे तर; पण व्यक्तीच्या किंवा जातीच्या बाल्यांतील अज्ञान व संस्कार- हीनत्व हीं कवित्वाला पूर्वी पोषक झालीं किंवा हल्लीं होतात असे मानण्यास आधार नाहीं हें ध्यानांत ठेवावें.

 ज्ञान हें कवित्वाला विरोधक नाहीं, तर उपकारक व उद्बोधक आहे असेंहि दाखवितां येईल, पण झाला आहे विस्तार तेवढ्यावरून वाचकांना बहुधा पटले असेल कीं, महाकाव्याच्या निर्मितीला अलीकडील ज्ञानवृद्धीनें अडथळा केला आहे हें म्हणणें अयुक्तिक व अनाधार आहे.

 अलीकडे लेखकांना महाकाव्यें लिहिण्यास व तीं वाचकांना वाचण्यास वेळ किंवा फुरसत मिळत नाहीं म्हणून, व 'मागणी तसा पुरवठा' या न्यायानें लघुकाव्यें व लघुकथा यांचीच फार मागणी असल्यामुळे, महा- काव्याचा पुरवठा अलीकडे होत नाहीं, या युक्तिवादांतहि सयुक्तिकता