पान:विचार सौंदर्य.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 

विचार सौंदर्य


कुरूप झाल्या आहेत असें नाहीं, सूर्यादि नवग्रह पूर्वी जसे होते तसेच हल्लीं आहेत. काम-क्रोध-लोभादि षड्रिपूंनीं हल्लीं रिपुत्व सोडून शस्त्रसंन्यास केला आहे असें ऐकिवांत नाहीं. मग महाकाव्याला अनुकूल विषय नाहींत या म्हणण्याचा अर्थ काय ? खरा प्रकार असा आहे कीं, अभाव काव्यात्मक दृष्टीचा आहे; विषयांचा नाहीं. नैतिकदृष्ट्या ज्याप्रमाणें एखाद्याची विषयवासना क्षीण होते; पण विषय कर्धी संपले नाहींत किंवा संपावयाचे नाहींत, त्याप्रमाणेंच काव्यदृष्ट्याहि विषय कर्धी संपले नाहींत व संपावयाचे नाहीत. काव्यदृष्टि किंवा काव्यात्मक वृत्ति असेल त्याला विषयांचा कधीं तुटवडा पडला नाहीं व पडणार नाहीं. प्रेमळ आईला बोबड्या मुलाचें कौतुक करण्याला जसे हरघडी विषय मिळतात किंवा प्रेममोहित तरुणाला ज्याप्रमाणे आपल्या प्रेयविषयक रमणीमध्यें क्षणोक्षण रमणीय नवता भासमान होते, त्याप्रमाणेंच लघुकाव्याला किंवा महाकाव्याला अनुकूल असलेली दृष्टि व वृत्ति ज्याच्यामध्यें आहे त्याला नवीन नवीन विषयांची वाण पडत नाहीं. पण सावत्र आयांना बोबड्या मुलामध्यें जसें कौतुकास्पद कांहींच दिसत नाहीं, किंवा वेदाभ्यासजड वृद्धांचें चित्त जसें युवतींच्या लीलांनीं द्रवत नाहीं, त्याचप्रमाणे महाकाव्य- निष्पत्तीला आवश्यक असलेली दृष्टि व वृत्ति ज्यांच्यामध्यें नसते त्यांना अलीकडच्या जीवनांत महाकाव्याला अनुकूल विषय मिळत नाहींत. काव्यनृत्य करूं शकणाऱ्याला तारांगण चालतें, रणांगण चालतें, नृपांगण चालतें, व स्मशानांतहि रुंडमालाधर शंकराप्रमाणें तो तांडवादि बीभत्स - भयानकादि रस उत्पन्न करणारें नृत्य करूं शकतो. उच्चतम काव्यनृत्य ज्यांना करतां येत नाहीं त्यांना मात्र सर्वत्र वांकडींच अंगणे दिसतात, विषय दिसतच नाहींत व परिस्थितीच प्रतिकूल असते !

 परिस्थितीचा व काव्याचा संबंध काय या मुद्द्याचा वरील एका वाक्यांतच वास्तविक समारोप करतां येईल. पण एतद्विषयक कांहीं गैरसमज दूर करण्याकरितां थोडासा विस्तार करणें जरूर आहे. अलीकडे पुष्कळ लोकांना असें वाटतें कीं, बऱ्याच गूढ गोष्टींचा कार्यकारणभाव आपणांस कळला आहे. कार्यकारणभावविषयक आपले अज्ञान कबूल करणें मनुष्यमात्राला केव्हांहि जड वाटतें, म्हणून पूर्वी अज्ञात कारणाला जेथें 'देव' म्हणत किंवा 'दैव' म्हणत, तेथें अलीकडे हे शब्द मागें पडत जाऊन त्यांच्याऐवजीं