पान:विचार सौंदर्य.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८६ 

विचार सौंदर्य


जेव्हां कौतुक करतो तेव्हां या वस्तु निर्माण करणाऱ्या कलाभिज्ञांचें कौशल्य आपल्या मनांत येतें हैं मला मान्य आहे. झाडावरचीं सुंदर फुलें पाहिलीं असतां साध्या मातींतून व पाण्यांतून हीं अनेकरंगी कोमल सुवासिक फुलें कोणत्या कारागिरानें कशी निर्माण केलीं असतील असा विचार त्या फुलांचें कौतुक करतांना आपल्या मनांत कित्येक वेळां येतो यांतहि कांहीं शंका नाहीं. सुंदर काव्य वाचीत असतां देखील अशाच रीतीनें कवीच्या कवित्वशक्तीचें आपण कित्येक वेळां कौतुक करतों हैं मला मान्य आहे. पण काव्यानंदामध्ये असल्या प्रकारच्या कौतुकाचा नेहमींच समावेश होतो असे नव्हे हैं एक; शिवाय वरील उपपत्तींत दुसरा असाहि दोष आहे कीं, काव्यानंदामध्यें ( किंवा कोणतीहि सुंदर वस्तु पाहून होणाऱ्या आनंदामध्यें ) दुसऱ्याहि पुष्कळ गोष्टींचा समावेश होतो याकडे दुर्लक्ष झालेले आहे.

 या मुद्दयाचा अधिक विचार करण्यापूर्वी काव्यानंदांत केळकर म्हणतात त्याप्रमाणें सविकल्प रीतीनें का होईना कोणाशीं आपण तादात्म्य पावतों हें प्रत्येकानें आपल्या मनाशीं स्पष्ट करून घेतले पाहिजे. तादात्म्य पावतों तें ( १ ) ग्रंथकारानें वर्णिलेल्या एका विशिष्ट पात्राशीं, का ( २ ) अनेक पात्रांशीं, का ( ३ ) ग्रंथकाराशी ह्याबद्दल ह्या बाबतीत आपला निश्चय झाला पाहिजे. ग्रंथकारानें वर्णन केलेल्या एका पात्राशीं आपण तादात्म्य पावतों असे म्हटले तर निर्जन सृष्टीच्या वर्णनांत आपण कोणाशीं तादात्म्य पावावयाचें हा वर निर्दिष्ट केलेला आक्षेप येतोच; त्याप्रमाणें दुसरेहि अनेक आक्षेप येतात. उदाहरणार्थ, नायिकेशीं पुरुषवाचकांनीं व नायकाशी स्त्रीवाचकांनीं कसें तादात्म्य पावावयाचें ? तसेंच

चिव चिव चिमणी छतांत - छतांत ।

या कविवर्य तांबे यांच्या कवितेंत आपण कोणत्या चिमणीशीं तादात्म्य पावतों ? या कवितेंतील काल्पनिक चिमण्या पाहणारे जे वाचक त्यांना जो आनंद होतो तो त्या चिमण्यांचे चमत्कारजनक व्यापार पाहून आनंद होतो; चिमणीशीं किंवा चिमण्यांशीं तन्मय होतो म्हणून नव्हे. त्याचप्रमाणें 'दत्त' कवीनें बाहुलीशीं खेळणाऱ्या लहान मुलीवर

बोलत कां नाहीं ! झाले काय तुला बाई ? ॥

असा आरंभ झालेली जी सुंदर कविता लिहिली आहे तेथें आपणांस जो