पान:विचार सौंदर्य.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाङ्मयाची प्रवृत्ति व त्याची ध्येयें

८५

एकाच स्थळीं आपण अनेक व्यक्तींचे अनेक स्थळींचे अनुभव घेऊं शकतों आणि म्हणून आपणांस काव्यानंद होतो असें रा. केळकरांचें मत आहे व तें विशिष्ट मर्यादेपर्यंत खरें आहे. पण त्यांत थोडी सुधारणा केली पाहिजे. उदाहरणार्थ, केळकरांच्या म्हणण्यावर असा एक आक्षेप घेण्यासारखा आहे कीं, आपण सृष्टीतील एखाद्या निर्जन पण सुंदर देखाव्याचें रसयुक्त वर्णन वाचलें म्हणजे आनंद पावतों तें कोणाशीं तादात्म्य पावून ? तेथें तर कोणीच मनुष्य नाहीं, कारण देखावा निर्जन आहे असे आपण कल्पिलें आहे. तेथील लतांवरच आपण व्यक्तित्व आरोपित करूं लागलों तर विक्रमोर्वशीय नाटकांतील वेड्या पुरूरव्याच्या पंक्तींत आपणांस बसविण्यांत येईल !

 कोठल्याहि सृष्ट पदार्थाशीं नव्हे तर सृष्टीचें वर्णन करणाऱ्या ग्रंथकाराशीं आपण तादात्म्य पावतों असें मला कोणी उत्तर देतील व श्रृंगारिलेल्या दिवाण- खान्यांत आपल्या खुर्चीवर बसून तेथला आनंद उपभोगून शिवाय पुन्हा ग्रंथकाराबरोबर सृष्टिशोभा पाहण्याचेंहि सुख आपण मिळवितों व एकसमयाव- च्छेदेंकरून उपभोगिलेल्या दुहेरी अनुभवामुळे आपणांस आनंद होतो असें ते म्हणतील. हें उत्तर रा. केळकरांना संमत आहे किंवा नाहीं हें मला ठाऊक नाहीं. पण आहे असे क्षणभर गृहीत धरूं या. ग्रंथकारानें केलेलें सृष्टिवर्णन वाचून आनंद कां होतो असा प्रश्न न घेतां प्रत्यक्ष सृष्टिशोभा पाहून आनंद कां होतो असा प्रश्न केला तर वरील उत्तर कां अपुरें पडतें हैं समजेल; कारण तेथें आपण कोणाशीं तादात्म्य पावतों याचें उत्तर देतां येत नाहीं. आतां कोणी म्हणतील कीं, सृष्टि उत्पन्न करणाऱ्या ईश्वराशीं तेथें आपण तादात्म्य पावतों. पण ईश्वर न मानणाऱ्या रसिकाला देखील सृष्टिशोभा पाहून जो आनंद होतो त्याची उपपत्ति वरील उत्तरानें लागत नाहीं. एखाद्या सुंदर सृष्ट वस्तूचें किंवा कलावस्तूचें वाङ्मयात्मक सुंदर वर्णन वाचून होणाऱ्या आनंदामध्ये ती ती वस्तु निर्माण करणाऱ्या बुद्धीबद्दल आपणांस जो आदर वाटतो किंवा जें कौतुक वाटतें त्याचा कित्येक वेळां समावेश होतो हें मला कबूल आहे. उदाहरणार्थ, आंब्याच्या बार्टीत राहणाऱ्या तलम धोतरजोडीचें जेव्हां आपण कौतुक करतो किंवा आंगठ्याच्या नखाएवढ्या लांबीरुंदीच्या हस्तिदंती तुकड्यावर खोदलेल्या एखाद्या सुंदर मूर्तीचें आपण