पान:विचार सौंदर्य.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८४ 

विचार सौंदर्य

निवड करून आणि लोकांना आकर्षक वाटेल असा त्या नटांना व नटींना पोषाक वगैरे देऊन हरतऱ्हेच्या चेष्टा त्यांच्याकडून ते करवून घेत असतात आणि लोकांना खूष करीत असतात ! मनुष्याच्या हृदयांत शृंगारिकच वासना असतात असे नव्हे. दुसऱ्याहि अनेक गूढवासना असतात ह्याचीहि सिनेमांतल्या डायरेक्टरांना जाणीव असल्यामुळे ते या वासनाहि छायात्मक रीतीनें तृप्त करण्याची सोय करून ठेवतात. उदाहरणार्थ, एका युरोपियन टायपिस्ट तरुणीचा वरिष्ठ अरेरावी असे व तिला टाकून बोलत असे, व त्याच्या विरुद्ध बोलण्याचें तिच्यांत धाडस नव्हते. तथापि सूड घेण्याची मात्र इच्छा सुप्त होती. ही स्त्री ऑफिसमधून सुटल्यानंतर " तरुणीनें जुलमी वरिष्ठाचा सूड उगवला " असा मथळा असलेल्या एका सिनेमाला जाते आहे, व सूडाची आपली इच्छा अशा रीतीनें तृप्त करून घेते आहे अशा प्रकारचें उदाहरण मी मनोगाहनी मानसशास्त्राच्या (Psycho-analysis) एका पुस्तकांत वाचल्याचें स्मरतें. आपल्याकडे पुष्कळ सरकारी व सावकारी नोकर सरकारविरुद्ध लिहिलेले केसरींतले वगैरे लेख मोठ्या हौसेनें वाचतात याच्या अनेक कारणांपैकी एक असे आहे कीं, सावकाराविरुद्ध व सरकारविरुद्ध त्यांच्या मनांत चरफड चाललेली असते आणि उघडपणें अशक्य असलेल्या पण गुप्तपणें इष्ट असलेल्या प्रतिकाराची व सूडाची त्यांची इच्छा अशा रीतीनें तृप्त होते ! पण हें जरी खरें असलें तरी प्रत्येक ठिकाणीं ही उपपत्ति लागू पडणार नाहीं. नाटकांतील, कादंबरीतील किंवा काव्यांतील पात्रार्शी आपले एक प्रकारचें तादात्म्य होतें याविषय आपल्या साहित्यशास्त्रांत भट्ट लोल्लट, शंकुक, नायक, अभिनवगुप्त, इत्यादिकांनीं बराच विचार केलेला आहे पण त्याचा येथें अनुवाद करीत नाहीं. तादात्म्यासंबंधी एकदोन गोष्टी सांगून या विषयाची रजा घेतों.

 रा.नरसिंह चिंतामण केळकर ह्यांनीं बडोद्याच्या आपल्या भाषणांत वाङ्मयांतील तादात्म्य अथवा समाधि पूर्ण नसते तर सविकल्प असते हे स्पष्टपणे दाखविले आहे आणि वाङ्मयात्मक टीकेची विचारपद्धति आणि भाषा यांमध्यें जें शैथिल्य होतें तें कमी केले आहे,याबद्दल टीकाशास्त्र त्यांचें ऋणी राहील. आपली भूमिका न सोडतां वाङ्मयांतील कल्पित पात्रांशीं आपण समरस होऊं शकतों व अशा रीतीनें एकाच वेळी व