पान:विचार सौंदर्य.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाङ्मयाची प्रवृत्ति व त्याची ध्येयें

८३

सुंदर स्त्रिया आणि त्यांचे विलास पाहून लोक आपल्या कामात्मक गूढ वासना अप्रत्यक्षपणें तृप्त करून घेत असतात, अशा प्रकारची उदाहरणें ते देतात. त्यांच्या या उपपत्तीमुळे अॅरिस्टॉटलच्या अन्तःशुद्धीचा वर निर्दिष्ट केलेला अर्थ परिस्फुट होतो. ( ३ ) इतर कित्येकांच्या मतें शोकगंभीर नाटकांत मनुष्य धीर-गंभीर व उदात्त नायकांशीं तादात्म्य पावून त्यांच्या उदात्तत्वाचा व धीरगंभीरत्वाचा, कांहीं वेळ का होईना, अनुभव घेतो आणि अशा रीतीनें त्याचें क्षुद्रत्व व अशुद्धत्व लोपून तो शुद्धतर व उच्चतर स्वरूप पावतो; परंतु हा जर अर्थ घेतला तर नाटकांतील वाईट लोकांशी, उदाहरणार्थ, खलपात्राशीं म्हणजे Villain शी, तादात्म्य पावून त्याचें मन दूषित होण्याचीहि आपत्ति आपणांस पत्करावी लागेल ! ( ४ ) कांहीं लोकांच्या मतें एखाद्या विशिष्ट धीरोदात्त नायकाशीं तादात्म्य पावल्यामुळे मनःशुद्धि होते असे नव्हे तर शोकगंभीर नाटक पाहतांना आपली एकंदर वृत्ति (attitude), आपल्या मनाची घडण किंवा ठेवण उच्चतर होते व त्या नाटकांतील देवघटित किंवा दैवघटित ( किंवा आपण सृष्टिनियम- घटित म्हणूं या ) न्यायाचा प्रत्यय येऊन व तो योग्य आहे असें आपणांस पटून आपल्या मनाला एक प्रकारचें समाधान वाटतें, एक प्रकारची प्रसन्नता येते व अशा रीतीनें शोकगंभीर नाटकांपासून 'कॅथर्सिस्' किंवा अंतःशुद्धि होते.

 अॅरिस्टॉटलच्या मनांत कोणताहि अर्थ विवक्षित असो, मला ही शेवटची उपपत्ति बरीच ग्राह्य वाटते. वर निर्दिष्ट केलेल्या इतर उपपत्ति थोड्याबहुत अंशानें खऱ्या आहेत पण त्या अपुऱ्या आहेत. उदाहरणार्थ, तादात्म्याची उपपत्ति घेऊं या. सिनेमांतल्या, नाटकांतल्या, काव्यांतल्या व्यक्तींशीं आपण एक प्रकारचें तादात्म्य पावतों हें खरें आहे व तादात्म्य पावून आपणांसहि ते ते अनुभव त्यांच्या द्वारें छायात्मक रीतीनें का होईना होऊं शकतात व आपल्या प्रेमात्मक व इतर वासनांची किंवा आकांक्षांची एक प्रकारची तृप्ति होते हैं खरें. हरतऱ्हेच प्रेमात्मक, साहसात्मक, पराक्रमात्मक दृश्यें दाखवून, तसेंच सुंदर स्त्रिया व देखणे पुरुष इत्यादिकांच्या हरतऱ्हेच्या शृंगारिक चेष्टा दाखवून, सामान्य लोकांचें मनोरंजन कसे करता येतें हैं सिनेमांच्या डायरेक्टरांस ठाऊक असतें व त्याप्रमाणे नटांची व नटींची