पान:विचार सौंदर्य.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाङ्मयाची प्रवृत्ति व त्याचीं ध्येयें

८१

ध्वनि म्हणतात, व रस सूचित झाला म्हणजे रसध्वनि म्हणतात. या सर्वोत रसध्वनि श्रेष्ठ दर्जाचा आहे. वस्तुध्वनीमध्यें सूचितार्थ निश्चित असतो, पण स्पष्ट शब्दांच्या द्वारें न सांगतां ध्वनिरूपानें सांगितला असतो, एवढेच. पण रसध्वनीमध्यें जो अर्थ सूचित होतो तो बराचसा अनिर्वचनीय असतो. तो शब्दांच्या पलीकडचा असतो. सुंदर गायन ऐकले असतां शब्दांनीं स्पष्ट व्यक्त करतां येणार नाहींत अशा कांहीं विचारलहरी व विकारलहरी आन्दोलित होऊं लागतात व एक प्रकारचा अलौकिक व अनिर्वचनीय आनंद होतो, तसाच प्रकार उच्चतम वाङ्मय श्रवण केले असतां किंवा वाचलें असतां होतो.

 हा आनंद अनिर्वचनीय म्हटलें, पण त्यांचें शक्य तेवढें पृथक्करण करणें वाङ्मय-मीमांसेच्या दृष्टीनें आवश्यक आहे. आपल्याकडे वाङ्मयांतील 'रसां' चा भाव,विभाव, अनुभाव वगैरे कल्पनांच्या द्वारें साहित्यशास्त्रांत चांगला व खोल विचार केलेला असला तरी त्यांत आतां भर घातली पाहिजे. बडोदें येथील साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष विद्वद्वर्य नरसिंह चिंतामण केळकर यांनी काव्यानंदाच्या उपपत्तींत आपल्या भाषणाच्या द्वारें थोडी भर घातली आहे, त्यांत आणखी थोडी भर घालतां आली तर पाहूं या. रसाची एकादी उपपत्ति पूर्णपणें यथार्थ व पर्याप्त आहे किंवा नाहीं हें ठरविण्याकरितां शोकगंभीर नाटकांना (Tragedies ना ) ती लावून पाहावी. वास्तविक शोकात्मक प्रसंग प्रत्यक्ष पाहून किंवा पुस्तकाच्या द्वारें वाचून दुःख व्हावें, मग शोकगंभीर नाटकें (Tragedies ) पाहून किंवा रघुवंशांतील अजविलाप, कुमारसंभवांतील रतिविलाप किंवा उत्तरराम- चरितांतील रामविलाप वाचून आपणांस एक प्रकारचा अलौकिक आनंद होतो, तो कां ? भवभूतीनें लिहिलेला विलाप ऐकून दगडाला देखील रडूं येईल व वज्राचें देखील हृदय भेदून जाईल अर्से म्हणतात. मग कोमल मनाचे सहृदय लोक उत्तररामचरित आनंदानें कां वाचतात ?

 काव्यांत दुःखकारक प्रसंग खरा नसतो, तर खोटा असतो हें जरी कबूल केलें तरी काव्यांतले का होईनात, असले शोकप्रचुर देखावे आनंद कसे उत्पन्न करि- तात हा आपला प्रश्न आहे. उत्तररामचरितांत रामानें आपल्या पूर्वचरित्रांतल्या देखाव्यांचीं चित्रेंच पाहिलीं, ते ते खरे प्रसंग कांहीं तो अनुभवीत नव्हता. मग

 त्रि. सौं. ...६