पान:विचार सौंदर्य.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८० 

विचार सौंदर्य

सत्याचा अपलाप करावयाचा नसतो किंवा असद्बोधहि करावयाचा नसतो; कारण असे केलें तर सात्त्विक आनंद व्हावयाचा नाहीं. बाह्यतः असत्य भासणाऱ्या गोष्टी सांगितलेल्या चालतील पण तत्त्वतः असत्य असलेल्या गोष्टी रसिकाला केव्हांहि सुंदर वाटणार नाहींत. त्याचप्रमाणे बाह्यतःच नव्हे तर तत्त्वतः अनैतिक असलेला बोध रसिकाला केव्हांहि रुचणार नाहीं. तथापि काव्यादिकांची प्रवृत्ति प्राधान्येंकरून आनंद देण्याकडेच असल्यामुळे आपणहि वाक्सौंदर्यापासून उत्पन्न होणाऱ्या आनंदाचाच आतां विचार करूं या. सौंदर्य हे कशांत आहे हें साकल्यानें सांगणे कठीण. पण त्यांत पुढील गुणांचा समावेश होतो यांत शंका नाहीं. सुंदर वाङ्मय काय किंवा सुंदर फूल, मूर्ति, स्त्री, गायन काय त्यांत एकप्रकारची सुव्यवस्था पाहिजे, समप्रमाणता पाहिजे, प्रमाणबद्धता पाहिजे, फुलांच्या पाकळ्यांत व त्यांच्या रंगांत अनेकविधता असून एक प्रकारचें ऐक्य किंवा सुसंबद्धता असते त्याप्रमाणेंच कोठल्याहि सुंदर वाङ्मयकृतींतहि असले पाहिजे. इन्द्रियांना तृप्ति देणें हा गुण क्षुद्र वाटतो पण सौंदर्याला तो फार आवश्यक आहे. हिरवें गार गवत दृष्टीला सुखकर असतें, मऊ मखमलीचें कापड स्पर्शाला सुखकर असतें, त्याप्रमाणेंच वाङ्मयांतील मधुर ध्वनि श्रवणाला सुखकर असतात, यमर्के, अनुप्रास वगैरे आवश्यक नसतील पण गद्यात्मक किंवा पद्यात्मक सुंदर वाङ्मयकृतींत एक प्रकारची तालबद्धता (लय ) व त्यांतील ध्वनींची कर्णमधुरता प्रतीत होते यांत शंका नाहीं. वर वर्णन केलेल्या गुणांशिवाय उपयुक्तता अथवा कार्यक्षमता हा गुण वाङ्मयांतल्या किंवा इतर कोणत्याहि सौंदर्याला आवश्यक आहे. वाड्मयांतील उपयुक्तता किंवा कार्यक्षमता म्हणजे जो अर्थ व्यक्त करावयाचा आहे तो पूर्ण यथार्थत्वानें व्यक्त करण्याची शक्ति औचित्य हाहि एक सौंदर्याला आवश्यक आहे. कोठलीहि सुंदर वस्तु पाहिली असतां हे गुण तेथें दिसतील, पण उच्चतम सौंदर्यात सूचकता हा गुण विशेषेकरून दिसून येतो. वाङ्मयशास्त्रांत या सूचकतेला ध्वनि म्हणतात. लक्षणा व ध्वनि यांतील भेद सांगण्यांत वेळ दवडीत नाहीं व केवळ ध्वनीचाच आतां विचार करतों. एक अर्थ प्रथम- दर्शनीं व्यक्त होत असतां दुसरा अर्थ व्यंजनावृत्तीनें सूचित झाला म्हणजे त्याला वस्तुध्वनि म्हणतात; एखादा अलंकार सूचित झाला म्हणजे अलंकार-