पान:विचार सौंदर्य.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाङ्मयाची प्रवृत्ति व त्याची ध्येयें

७९

tionists) म्हणतात, किंवा आपल्याइकडचे वेदान्ती परमात्मा मूलतः निर्गुण व अनिर्वचनीय स्वरूपाचा असून त्याचे अंश जे जीव त्यांच्या निरनिराळ्या देहांच्या द्वारे त्या परमात्म्याला सगुण स्वरूप येतें असें जसें म्हणतात,त्याचप्रमाणें सौजन्यहि मूलतः एकाच स्वरूपाचें असेल, पण त्याचें व्यक्त स्वरूप व्यक्ति, काल, स्थल इत्यादि भेदांमुळे अनेकविध झालेले आहे. पूर्वी आपण कांहीं गोष्टी नीतिदृष्ट्या चांगल्या चांगल्या मानीत होतों पण आपण त्या आतां चांगल्या मानीत नाहीं. लहानसहान गोष्टी सोडूनच द्या, मोठमोठ्या गोष्टी, उदाहरणार्थ- कुटुंबसंस्था, विवाहसंस्था, धर्म, राजनिष्ठा, इत्यादिकांचें स्वयंभू व अनादि- सिद्ध वाटणारें प्रामाण्य आणि पावित्र्य कित्येक लोक आतां मानीनातसे झाले आहेत. नदीचें मूळ व ऋषीचें कूळ पाहूं नये असे म्हणतात. पण आपण आतां सगळ्यांचेंच मूळ व कूळ तपासूं लागलों आहोत व त्यांचें प्रामाण्य आणि पावित्र्य आप्तवाक्य किंवा दीर्घकालीन परंपरा एवढ्याच आधारांवर गृहीत धरणें आपणाला श्रेयस्कर वाटेनासे झाले आहे. अशा स्थितींत शक्य तेवढा साधकबाधक व सांगोपांग विचार करून ज्याला जें योग्य वाटेल तें त्यानें करावें आणि इतरांना करण्याला सांगावें. हाच माग उरलेला आहे. खरा वाङ्मयभक्त विचारान्तीं ठरलेल्या आपल्या ध्येयाला अनुसरून वागेल व आपल्या वाङ्मयकृतीच्या द्वारे लोकांना तें ध्येय प्रिय, मान्य व आदरणीय होईल अशा रीतीचें आपलें धोरण ठेवील. इतरांना काय वाटतें, लोक काय म्हणतील, ह्याची तो विशेष पर्वा करणार नाहीं. लोकविरुद्ध असलेलें शुद्ध नीतितत्त्व सांगण्यास तो कचरणार नाहीं. परंपरागत शुद्ध आचार व शुद्ध तत्त्वें हीं लोकांच्या आदरास व प्रेमास पात्र व्हावींत म्हणून त्याची वाङ्मयप्रवृत्ति होईल, पण परंपरागत अशुद्ध व धातुक तत्वें आचार, चालीरीति वगैरेंचें आदरणीयत्व आणि हास्यास्पदत्व लोकांच्या नजरेस आणून देण्याच्या कटु कर्तव्यापासून त्याची वाङ्मय- कृति निवृत्त होणार नाहीं.

 सौंदर्योपासक वाङ्मयामध्यें सत्यशोधन किंवा सद्बोध यांपेक्षां आनंदाला अधिक महत्त्व असतें. सौंदर्यप्रतीतीपासून एक प्रकारचा अलौकिक आनंद होतो. असा आनंद काव्यादिकांच्या द्वारें प्राप्त करून देतांना तत्त्वतः