पान:विचार सौंदर्य.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

७८ 

विचार सौंदर्य


याचाहि विचार मनुष्यानें केला पाहिजे असे मला वाटतें. सात्त्विक मनोवृत्ति किंवा भावना यांचे प्रामाण्य स्वतःसिद्ध नाहीं, तें सापेक्ष आहे. विशिष्ट स्थलीं, कालीं व प्रसंगीं तें योग्य असेल, पण नेहमीच तें स्वीकारणीय नाहीं. परंतु हा वादाचा व मतभेदाचा प्रश्न आहे व त्याचें येथें विस्तारानें विवेचन करण्याचें प्रयोजन नाहीं. तात्त्विक विवेकबुद्धि जें सांगेल तें प्रमाण माना किंवा मनोवृत्ति जें सांगतील तें सत्य माना. परंतु ज्याला जे सत्य वाटेल त्या सत्याकरितां खऱ्या वाङ्मयभक्ताने सर्वस्वाचा त्याग केला पाहिजे, हा मुख्य मुद्दा आहे. आपणास जें सत्य प्रतीत झाले असेल किंवा प्रमाणभूत वाटत असेल त्या सत्याची प्रल्हादाप्रमाणे आपण भक्ति केली पाहिजे. युरोपमध्यें साक्रेटिस, गॅलीलिओ, वगैरे लोकांचा अशा सत्यभक्तीमुळें छळ झाला आणि कित्येकांना प्राणासहि मुकावें लागले आहे; तथापि, त्यांनी आपला ' सत्याग्रह ' सोडिला नाहीं. अशा प्रकारचे सत्याग्रही सत्यभक्त मला पाहिजे आहेत. मराठी वाङ्मयांत अशा प्रकारची सत्यभक्ति कितपत दिसते याचें मी कांहीं अंगांचें लवकरच निरीक्षण करून विवेचन करणार आहे; पण त्याच्या पूर्वी सौजन्य म्हणजे काय व सौजन्यबोध कशा प्रकारचा असावा त्याची थोडीशी मीमांसा करूं या; म्हणजे या दोन्ही दृष्टींनीं निरीक्षण व विवेचन करण्यास सोईचें पडेल.

 सत्याप्रमाणेंच सौजन्याचेंहि परम-तत्त्व अद्यापि आपणाला हस्तगत झालेलें नाहीं. सत्याप्रमाणेंच सौजन्यहि अद्यापि बरेचसें अनिश्चित, व्यक्ति- निष्ठ व वर्धिष्णु आहे. तें जणुं कांहीं प्रयोगावस्थेत असून त्याचे स्वरूप बदलणारें आहे. काल-स्थिति-परिस्थिति-भेदानें त्याला निराळा आकार येतो, निराळा रंग चढतो व निराळ्या साधनांच्या द्वारें व क्रियांच्या द्वारें तें व्यक्तत्व पावतें. एखादे वेळेस एखाद्या विशिष्ट स्थितींत रक्तस्राव करण्या- मध्यें सौजन्य असेल तर दुसऱ्या एखाद्या विशिष्ट परिस्थितींत आपला रक्तस्राव होऊं देण्यांत तें व्यक्त होईल. एकादे वेळेस एखाद्याला भाकरीशीं खाण्याकरितां मीठ देण्यांत सौजन्य असेल तर दुसऱ्या एखाद्या परिस्थितींत घरची भाकरी खाऊन मीठ तयार करण्यामध्यें तें व्यक्त होईल. जीवशक्ति मूलतः एकच असून निरनिराळ्या प्राणीवर्गांच्या द्वारें व्यक्त स्वरूप पावत आहे असे जसें कांहीं आधुनिक भौतिकशास्त्रज्ञ (Creative Evolu-