पान:विचार सौंदर्य.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाङ्मयाची प्रवृत्ति व त्याची ध्येयें

७७

ठरवावयाचें ह्याविषयीं तुम्ही आम्हांला कांहीं सांगा; नुसतें सत्यभक्तीचें माहात्म्य गाऊं नको," -— असा जर कोणी आक्षेप घेतला तर त्यावर माझें थोडक्यांत उत्तर असें आहे:- पूर्ण ज्ञान म्हटलें म्हणजे त्यांत हा शोकजनक कलह राहणार नाहीं; परंतु असें ज्ञान तुम्हां-आम्हांपैकीं थोड्यांच्याच वांट्यास येणारें असल्यामुळे तुम्हीं घातलेला पेंच खरा आहे. त्या पेंचांतून सुटण्याकरितां ज्यानें त्याने आपणाला जो सत्याचा अंश कळेल व पटेल त्याची कास धरावी, व सत्याची आणि आप्तवचनांची वगैरे आपणाला जमेल तशी एकवाक्यता घडवून आणावी. माझ्या स्वतःविषयीं म्हणाल तर मी अलीकडे आप्तवचनांना , भावनांना (Emotions) व स्थिरवृत्तींना (Sentiments) महत्त्व देणारा पण त्यांचें निरपवाद प्रामाण्य व मानणारा असा विवेकवादी (Rationalist) होऊं लागलों आहे. दुसरे कांहीं विचारी लोक आप्तवाक्यवादी आहेत, इतर कांहीं स्थिरवृत्तिवादी आहेत. कै. महादेव शिवराम गोळे यांनीं ह्या वर्गातल्या लोकांचे म्हणणें " हिंदुधर्म आणि सुधारणा"या आपल्या पुस्तकांत ' लीलावती ' या काल्पनिक पात्राच्या द्वारें पुढे दिलेल्याप्रमाणे सांगितलें आहेः—

 लीलावती म्हणते:-:-" या कर्मभूमीत आयुष्याचे मार्गक्रमण
 करीत असतां कर्तव्यास कोणते वळण द्यावें तें समजेनासे
 होतें, स्तब्ध उभे राहण्याची पाळी येते, त्यामुळे आयुष्याचा
 काळ फुकट जाऊं लागतो. अशा वेळीं कर्तव्यमार्गावर प्रकाश
 पाडणाऱ्या प्रसंगोचित मनोवृत्ति मनांत उद्भवतात, त्या बुद्धीस
 प्रेरणा देतात; त्या प्रेरणांस अनुसरल्याने कर्तव्याची दिशा
 चुकत नाहीं, वाटेंतील सर्व दुःखें सुसह्य होतात.... हे
 जाणून सर्वांनी उत्कृष्ट मनोवृत्तींचा उत्तम प्रतिपाळ करावा,
 जिवापलीकडे त्यांस जपावें. हेच शिक्षण सर्वास पाहिजे- हीच
 अध्यात्मविद्या होय."

 मला हा निर्णय पूर्णपणे पसंत नाहीं. मनोवृत्तींचे महत्त्व मी जाणतों; पण मनोवृत्ति कशा उत्पन्न होतात, त्यांचें प्रामाण्य कितपत व कोठें आहे