पान:विचार सौंदर्य.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाङ्मयाची प्रवृत्ति व त्याचीं ध्येयें

७५

ज्ञान पुरे होवो किंवा न होवो, तें पूर्ण होणे शक्य असो वा नसो, ज्ञानो- पार्जनाच्या बाबतींत शक्य तेवढा प्रयत्न करीत असतात याचें कारण असें कीं, सत्यामध्ये स्वतःसिद्ध असें एक प्रकारचें पावित्र्य व मान्यत्व आहे. ज्ञानामुळे द्रव्यप्राप्ति होते म्हणून ते प्रिय आहे असे नव्हे किंवा सामर्थ्य वाढतें म्हणून तें प्रिय आहे असें नव्हे, किंवा कीर्ति मिळते म्हणून तें प्रिय आहे असेंहि नव्हे. द्रव्यप्राप्ति किंवा सामर्थ्यप्राप्ति किंवा यशःप्राप्ति होते म्हणून ज्ञान प्राप्त करून घ्यावयाचें ही खरी सत्यभक्ति नव्हे. ज्ञानामुळे एक प्रकारचा आनंद होतो ही गोष्ट खरी आहे; परंतु आनंदाकरितां ज्ञान मिळवावयाचें ही गोष्टहि खरी नव्हे. खरा जिज्ञासु आनंद न देणारें सत्यहि जाणण्याची खटपट करील. सत्यज्ञानामुळे आपल्या आनंदांत भर पडो किंवा त्यामुळे मनःस्वास्थ्य बिघाडों; फार काय, कटु व कठोर सत्य कळल्यामुळे आपणांस अत्यंत प्रिय व पूज्य असलेल्या नैतिक किंवा धार्मिक कल्पना दृढ होवोत किंवा त्यांचा मूलाधार कंपित होवो; सत्यामुळे सत्कर्माकडे सोत्साह प्रवृत्ति होवो किंवा हॅम्लेटप्रमाणें ( अथवा आपल्या इकडील अर्जुनाप्रमाणें ) कांहीं काल हृदयदौर्बल्य येऊन नैष्कर्म्याकडे आपली प्रवृत्ति होवो, – सत्य हें खऱ्या जिज्ञासूला कांहींहि झालें तरी प्रिय व आदरणीय असले पाहिजे. उप- निषदामध्यें नचिकेताची जी गोष्ट आहे ती येथें ध्यानांत आणावी. परलोक आहे किंवा नाहीं याविषयीं त्याची जी तीव्र जिज्ञासा होती ती यमदेवानें जे त्याला वर दिले होते त्यांना भुलून त्यानें सोडिली नाहीं व अखेर त्यानें आपला अंतिम सत्य जाणण्याचा आग्रह चालवून घेतला आणि निःश्रेयस प्राप्ति करून घेतली. नचिकेत तसाच दैववान् होता म्हणून त्याला निःश्रेयस प्राप्ति झाली, इतरांना सत्य जाणण्याच्या सत्याग्रहामुळे एखादवेळेस व्यावहारिक किंवा नैतिक संकट प्राप्त होण्याचा संभव असतो असा आक्षेप येथें कांहीं लोक घेतील व इंग्लंडमधील प्रसिद्ध तत्त्ववेत्ता जॉन स्टुअर्ट मिल ह्याला एकानें " तूं हें मत खरें मानलेंस तर तुला नरकांत जावें लागेल ", अशा प्रकारचा जसा पेंच घातला होता तसा पेंच सत्यप्रियतेमुळे कोणाला पडला तर त्याने काय करावें, असें मला विचारतील; पण त्यांना जॉन स्टुअर्ट मिलप्रमाणेंच माझें उत्तर सरळ व निश्चित आहे आणि तें हें कीं- “To hell shall I go.” (" हो, सत्यभक्तीमुळे नरकवास आला