पान:विचार सौंदर्य.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

७४ 

विचार सौंदर्य

निर्मितीला अभ्यास लागतो, परिश्रम लागतात, अनुभव लागतो, अंतःकरण व भावना शुद्ध व सुसंस्कृत करणें भाग असतें; वृत्ति स्थिर, सुसंबद्ध व प्रसन्न व्हाव्या लागतात; नीतिविषयक कांहीं तरी ध्येयें असावी लागतात; व तीं अंगीं बाणावींहि लागतात. शिवाय नवनिर्मितिसमर्थ अशी कल्पकता किंवा प्रतिभाहि तेथें आवश्यक असते. केवळ मूळस्वरूपांतल्या तात्कालिक भावनांच्या उद्रेकावर, क्षोभावर, कंपावर, ऊर्मीवर, खळबळीवर विसंबून चालत नाहीं. एखाद्या विषयाचें अध्ययन पुष्कळ केलेले असले आणि मनन पुष्कळ झालेले असले म्हणजे कसलेल्या लेखकाला किंवा वक्त्याला शब्द आपोआप स्फुरतील हैं मला कबूल आहे. पण लेखकाला किंवा वक्त्याला मी लिहीत आहे किंवा बोलत आहे ही जाणीव कधीहि पूर्णपणे नष्ट होत नाहीं, व मूलभूत विकारांच्या तर तो कधींहि स्वाधीन होत नाहीं. असो.

 कसेंहि असले तरी एवढी गोष्ट खरी कीं, बुद्धिपुरस्सर किंवा बोधपूर्व वाङ्मय ह्याचा उगम ( १ ) सत्यसंशोधन किंवा सत्यकथन, ( २ ) सौजन्य- पृथक्करण व सौजन्यबोध आणि (३) सौंदर्यमीमांसा व सौंदर्योपासना ह्यांमध्ये आहे. सत्यसंशोधन व सत्यकथन यासंबंधाचा विचार करावयाचा म्हणजे तुम्हीं-आम्हीं असें प्रांजलपणे कबूल केले पाहिजे की आपण कोणीहि परिणत-प्रज्ञ, विगत-शंक ब्रह्मवेत्ते नाहीं. अंतिम व निरपेक्ष सत्य (absolute truth) हे आपल्या कोणाच्या हातीं आलेले नाहीं. आपण सर्व जिज्ञासु आहोत. जगांतील हरतऱ्हेच्या सजीव-निर्जीव वस्तूंचे गुणधर्म, त्यांचे व्यापार-व्यवहार, त्यांचे नियम, त्यांची कार्ये, त्यांची अंतिम स्थिति, इत्यादि गोष्टी आपणांस अद्यापि साकल्यानें कळलेल्या नाहींत. त्या जेव्हां कळतील, इतकेच नव्हे तर त्या तशाच असाव्यात असें वाटू लागेल व त्यांच्याकडे आपण प्रसन्न चित्तानें पाहूं शकूं त्या वेळेस आपणास पूर्ण ज्ञान झाले असे म्हणतां येईल. असें ज्ञान आपणा कोणास झालेलें नाहीं; इतकेंच नाहीं तर इहजन्मीं होईल किंवा नाहीं याबद्दलच शंका आहे. पुनर्जन्मावर विश्वास ठेवणारे जे लोक आहेत ते

अनेकजन्मसंसिद्धः ततो याति परां गतिम्

अशा प्रकारच्या वचनांवर श्रद्धा ठेवून आपल्या मनाचें समाधान करून घेत असतील. माझ्यासारखे पुनर्जन्मावर पूर्ण श्रद्धा नसलेले संशयात्मे असतील ते