पान:विचार सौंदर्य.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाङ्मयाची प्रवृत्ति व त्याची ध्येयें

७३

वगीत पडतील व ज्या प्रमाणांत ती परिश्रमपूर्वक व विचारपूर्वक केलेली असतील व त्यांतील शब्द मोजून, मापून, तोलून, बदलून, कमी, अधिक करून घातलेले असतील त्या मानाने तीं बोधपूर्व, हेतुपूर्व, वाड्मयवर्गात पडतील. नामदार गोखले यांचीं घरीं तयार केलेलीं व टाइपराइट केलेली कौन्सिलमधलीं कांहीं नामांकित भाषणें बव्हंशीं दुसऱ्या वर्गातलीं होत. परंतु १९०६ च्या राष्ट्रीय सर्भेत केवळ बंगालपुरताच बहिष्काराचा ठराव मान्य करावा अशा आशयाचा समेट ठरला असतां व ठरावाच्या भाषेंतहि बहिष्काराची व्याप्ति बंगालपुरतीच आहे असे म्हटलें असतां राष्ट्रीय पक्षाचे पुढारी बिपिनचंद्र पाल ह्यांनी आपल्या भाषणांत " a movement which moves from village to village, from town to town, from district to district, and from province to province" अशा प्रकारचें जें गोखल्यांना अनिष्ट व अनधिकृत वाटणारें भाष्य केलें तें ऐकून रागानें व आवेशानें गोखल्यांनीं जें तात्कालिक स्फूर्तीने भाषण केलें तें कांहीं अंशीं सहजस्फूर्त व अबोधपूर्व वर्गातील होय असें मला वाटतें.

 वाङ्मयाचा सहेतुक किंवा बोधपूर्व प्रकार जो सांगितला त्यामध्यें स्फूर्तीला व भावनांना कांहीं अवकाश नाहीं असें मला म्हणावयाचें नाहीं. मला एवढेच म्हणावयाचें आहे कीं, मूलस्वरूपांतल्या भावना किंवा मनोविकार यामुळे वाङ्मयनिर्मिति होत नाहीं. मनुष्य खरा रागावला असतां तो रागाचें वर्णन करीत नाहीं; कामवश झाला असतां कामाच्या प्रभावाचें वर्णन करीत नाहीं; पत्नी मेली असतां तिच्या गुणांचें काव्यात्मक स्मरण करीत नाहीं. मनोविकारांचा क्षोभ ओसरला, स्मृतिक्षेत्रांत गेला, त्यांतील व्यक्तिनिष्ठ भाग नष्ट होऊन भावना सुसंस्कृत झाल्या, अंतःकरणामध्ये एक प्रकारची प्रसन्नता उत्पन्न झाली व आपल्या भावनांच्या मनोविकारांच्या पोटीं जें एक प्रकारचें सौंदर्य असतें तें प्रतीत झालें, म्हणजे मग कलाविलासप्रिय कल्पनाशक्ति वाङ्मयनिर्मितीला प्रवृत्त होते. वाङ्मयनिर्मितीला प्रारंभ करतांना मनोविकारांचा क्षोभ तेथें पूर्वगामी असतो हैं मला कबूल आहे; पण हा क्षोम मूलभूत स्वरूपाचा नसतो; तर स्मरणशक्तीच्या द्वारें विशिष्ट देखावे मनश्चक्षूंपुढे आणून, त्यांतील स्वारस्य अनुभवून व मनोविकारावर एक प्रकारचे संस्कार घडवून उत्पन्न केलेला असतो. बुद्धिपुरस्सर वाङ्मय-