पान:विचार सौंदर्य.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

७२ 

विचार सौंदर्य

तोंडून बाहेर पडेल हें कोणीहि कबूल करील. मनोविकारांना कांहीं वेळां आवेशयुक्त व तालबद्ध शब्दांच्या द्वारें व्यक्त स्वरूप मिळते हा अनुभव आहे. अगदी रानटी अवस्थेत आयांनी आपल्या मुलांना निजवितांना जी अंगाई-गीतें गाइलीं असतील तीं अशाच प्रकारें निर्माण झालेल्या चरणांची हळूहळू जुळणी होऊन झालेली असतील. त्याप्रमाणे रानटी स्थितींतल्या मुलांनीं नाचतांबागडतांना किंवा वीर-पुरुषांनी लढाईवर जातांना जी गाणीं किंवा जे पोवाडे म्हटले असतील ते अशाच प्रकारें ( बर्फाचा गोळा जसा हळूहळू भर पडून वाढत जातो त्याप्रमाणें ) अनेकांच्या मुखांमधून पुनरावृत्ति होतां होतां हळूहळू त्यांत भर पडून झालेले असले पाहिजेत अशी माझी समजूत आहे.

 हे पोवाडे किंवा गाणीं यांची आपण चांगल्या वाङ्मयांत गणना करतों हें खरें, पण सुंदर वाङ्मय निर्माण करावें म्हणून तीं कांहीं निर्माण झालेली नव्हेत, किंबहुना तीं एकाच कवीनें केलेली नसून अनेकांचा हातभार त्याला लागून तीं झालेलीं आहेत अशी माझी समजूत आहे. आपण जीं कांहीं खाजगी पत्रे लिहितों तीं वाङ्मय निर्माण करण्याकरितां लिहीत नाहीं; तथापि त्यांपैकी कांहींजणांचीं कांहीं पत्रे प्रसिद्ध झालीं तर वाङ्मयांत चांगली भर पडेल अशा योग्यतेचीं ती असतात. राजवाडे, खरे, पारसनीस यांसारख्या इतिहासभक्तांनीं स्वार्थत्यागपूर्वक ऐतिहासिक पत्रे, खलिते वगैरे लिखाणें प्रसिद्ध केलीं आहेत व मराठी वाङ्मयामध्ये त्यांची चांगली भर पडली आहे. परंतु हीं पत्रे देखील बऱ्याच अंशीं अबोधपूर्व वाङ्मयभागांतच पडतील. 'बऱ्याच अंशीं' म्हणण्याचें कारण असे कीं पत्रे, खलिते, फर्माने लिहिणा-यांच्या मनांत आपलें लिखाण 'वाङ्मय'म्हणून छापून प्रसिद्ध होईल अशी इच्छा किंवा कल्पना जरी नसली तरी ज्याच्या वाचनांत आपलें लिखाण येईल त्याच्या मनावर विशिष्ट परिणाम घडून यावा, त्यांना तें चांगले वाटावें, अशा प्रकारची इच्छा ह्या लेखकांच्या मनांत होतीच. युरोपांतील डिमॉस्थेनीस, सिसेरो, बर्क वगैरे वक्त्यांचीं किंवा आपल्या लो० टिळक, गोखले, शिवरामपंत परांजपे यांचीं भाषणें अबोधपूर्व वाङ्मयाच्या सीमेवरची आहेत. ज्या प्रमाणांत तीं तत्कालीन आवेशाच्या भरांत सहजस्फूर्तीनें केलेली असतील त्या प्रमाणांत ती पहिल्या